नागपूर : स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. रविवारी सकाळी पाऊणेसात वाजता शारजाह-नागपूर आंतरराष्ट्रीय विमान उतरले. ओमिक्रोनचे सावट घोंघावत असल्याने सारेच दहशतीमध्ये होते. सारे वातावरण चिंताग्रस्त होते. तणावाच्या वातावरणात महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एक-एक करीत शंभर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली. तब्बल दीड ते दोन तास नमुने घेतले. जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत प्रवाशी विमानतळावरच थांबले होते. मनात धास्ती होती. सुदैवाने कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.
आप्त स्वकीय येणार म्हणून नातेवाइकाला घेण्यासाठी एकीकडे गर्दी केली होती. मात्र, शारजा विमानातून येणाऱ्यांना विमानतळाच्या आतल्या परिसरात थांबवले होते. चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे साऱ्यांना सोडण्यात आले. मात्र, प्रवाशांचे राहण्याचे ठिकाण, संपर्क मोबाईल नंबर आदींची माहिती घेण्यात आली. यानंतरच त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याची अट घालण्यात आली.
कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे जगभरात चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये हा व्हेरियंट सापडला असून येथून आलेल्या काही प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. पण, त्यांना ओमिक्रॉनची लागण झालीय का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, कोरोनाला वेळीच अटकाव घालण्यासाठी केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पण, काही राज्यांनी त्यांच्या स्वतंत्र गाइडलाईन्स जारी केल्या असून कोणत्या राज्यात काय निर्बंध आहेत? हे आपण पाहुयात. तुम्ही कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर या गाइडलाइन्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
तीन दिवसांनंतर पुन्हा सर्व प्रवाशांना संपर्क करण्यात येणार आहे. पुढील चाचणीत कोविड तपासणीनंतर नियमाप्रमाणे उपचार सुरू करण्यात येतील. ८ दिवसांनंतर पुन्हा सर्व शंभर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. यात कोणताही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्यास आमदार निवासातील कोविड सेंटरमध्ये राहावे लागणार आहे.
ओमिक्रॉनचा नवीन व्हेरियंट राज्यात आढळला. यामुळे केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिकेच्या वतीने विमानतळावर चाचणीसाठी व्यवस्था केली होती. एअर अरेबियाचे शारजाह ते नागपूर विमान उतरल्यानंतर सर्वांना वेगळ्या कक्षात थांबविले होते. नागपूर ते शारजाह प्रवास करणाऱ्या ९५ प्रवाशांची चाचणी करून विमानात प्रवेश देण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमानातील येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे.
ओमिक्रॉनचा संक्रमण पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शासनाच्या सूचनेनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. रविवारी सकाळी शारजाहून विमान आल्यानंतर विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी कक्षात पाठविण्यात आले. निगेटिव्ह अहवालानंतर प्रवाशांना गृहविलगीकरणात राहण्याची सूचना केली. महापालिकेच्या पथकाची नजर असणार आहे. हे पथक दुसऱ्या, चौथ्या व सातव्या दिवशी संबंधित प्रवाशाच्या घरी जाऊन माहिती घेणार आहे. प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल, मेयोत पाठवण्यात येईल.