नागपूर : अमरावती रोडवर स्थित सुराबर्डी येथील राष्ट्रीय स्फोटक आणि व्यावसायिक स्फोटक कंपनीला वेढलेल्या जंगलात मध्यरात्री आग लागली. आग पसरण्याचा मोठा धोका होता. पण, मोठा अनर्थ टळला. परंतु अग्निशमन सेवेने वेळीच कारवाई केल्याने अपधात होण्यापासून टळला.
रात्रीच्या सुमारास आग केवळ ५० टक्के नियंत्रणात आली होती. अमरावती रोडवर सुराबर्डी टेकड्यांचे वनक्षेत्र आहे. तिथेच अपारंपरिक अभियान पोलिस प्रशिक्षण केंद्रही असून स्फोटक निर्मिती कंपन्या आहेत. महापालिका हद्दीपासून ९ किमी अंतरावर आगीचे ठिकाण असून आग ६ किमी परिघात पसरलेली आहे. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेकडून ५ वॉटर टेंडर, वाडी नगर परिषदेकडून १ वॉटर टेंडर आग विझवण्याच्या कामात आहेत. आज पहाटेपर्यंत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते.
टेकड्यांवरील जंगल असल्याने तसेच स्फोटके कंपन्या आणि रहिवासी क्षेत्र, वन टेकड्यांलगत निवासी वसाहत असलेले पोलिस प्रशिक्षण केंद्र असल्याने अत्यंत कठीण प्रदेशात अग्निशमन दलाचे जवान आगीशी झुंज देत आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या जलसाठ्यातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. राहुल केबल्स प्रायव्हेट लिमिटेडचे करोडो किमतीचे महागडे केबल ड्रम आगीत जळून खाक झाले. परंतु कंपनीतील आगीचा प्रादुर्भाव रोखण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आणि ७६ केबल ड्रम वाचले.