नागपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या दोन्ही भागांत नियमांचा भंग करून उभ्या करण्यात आलेल्या सात ते आठ उंच इमारती विमान वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक आहेत. एकतर त्या पाडाव्या लागतील किंवा धावपट्टीची लांबी कमी करावी लागेल, असा स्पष्ट इशारा वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया विजय मुळेकर यांनी दिला.
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणतर्फे हॉटेल रेडीसन ब्ल्यू येथे ‘विमानतळालगतच्या बांधकामासाठी एनओसी’ विषयावर आयोजित कार्यशाळेदरम्यान मुळेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुळेकर म्हणाले, चिंचभुवनच्या दिशेने एक तर उर्वरित धोकादायक इमारती जयताळा भागात आहेत. अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.कारवाईचे अधिकार असलेल्या महापालिकेलासुद्धा २०१६ पासून पाचवेळा पत्र लिहिण्यात आले आहे. आयुक्तांशी चर्चा केली पण, हे काम डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे.
प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अस्तित्वातील ३२०० मीटर धावपट्टीची लांबी ५६० मीटरने कमी करावी लागू शकते. नवीन प्रस्तावित धावपट्टीच्या भागातही अशीच समस्या असल्याने टाउन प्लानिंग विभागाने नव्या धावपट्टीकडील इमारतींना नाहरकत प्रमाणपत्र देणे काही काळासाठी थांबविणे गरजेचे असल्याचे मुळेकर यांनी सांगितले.
अधिक वाचा : Koradi & Khaparkheda power plants to get coal conveyor belt soon