नागपूर : कोलकाता येथील एन. आर. एस. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हृदयरोग विभागात सेवा देणारे निवासी डॉक्टर परिभा मुखर्जी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचे उपराजधानीतही पडसाद उमटले. या निषेध करण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने शुक्रवारी मेडिकल आणि मेयोच्या अपघात विभागासमोर धिक्कार आंदोलन करीत मास बंक पुकारला.
अत्यावश्यक सेवा वगळता दिवसभर एकही डॉक्टर कामावर जाणार नाही. येत्या दोन दिवसांत डॉक्टरांना सुरक्षा मिळाली नाही, राज्यभर आणि देशभर हे आंदोलन केले जाईल, असा अल्टिमेटमही मार्डने दिला आहे.
या घडामोडीत लोकशाही मार्गाने घटनेचा निषेध करणाऱ्या कोलकाता येथील निवासी डॉक्टरांना वसतीगृह रिकामे करण्याचे आदेश पश्चिम बंगाल सरकारने काढल्याने याचेही प्रतिबिंब मार्डच्या आंदोलनात उमटले. केंद्र सरकारने यात मध्यस्थी केली नाही तर देशभरातील निवासी डॉक्टर रविवारपासून बेमुदत आंदोलनावर जातील, असा इशाराही निवासी डॉक्टरांच्या केंद्रीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनू गौतम यांनी दिला आहे.
नागपुराती मार्डच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे, महासचिव डॉ. आशुतोष जाधव, उपाध्यक्ष डॉ. रमेश कलशेट्टी, डॉ. शुभम इंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांची भेट घेऊन आंदोलनाचा अल्टिमेटम दिला. अतिदक्षता विभाग वगळता निवासी डॉक्टर सकाळी आठ ते पाच या वेळेत कुठल्याही वॉर्डात काम करणार नाहीत, असेही डॉ. मित्रा यांना कळविण्यात आले.
अधिक वाचा : World Blood Donor’s Day at SURELIFE Hospital, Sitabuldi Nagpur