उपराजधानीत वर्चस्वासाठी टोळीयुद्धातून गुन्हेगाराचा खून

नागपूर : उपराजधानीत अल्पवयीन गुन्हेगार सक्रिय झाले असून, वर्चस्वासाठी टोळीयुद्ध भडकले आहे. यातूनच दोन अल्पवयीन गुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने कुख्यात गुन्हेगाराची हत्या केली. ही खळबळजनक घटना एमआयडीसीतील राजीवनगर भागात मंगळवारी रात्री घडली. एमआयडीसी पोलिसांनी सूत्रधार दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन एका मारेकऱ्याला अटक केली.

संदीप हिराचंद बावनकर (वय २२, रा. बहुजन कॉलनी), असे मृताचे तर गणेश ऊर्फ बऱ्या राम दांडेकर (वय २४) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपविरुद्ध हत्येचे दोन व हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. एमआयडीसी भागात त्याचे वर्चस्व होते. तो गुन्हेगार असलेल्या अल्पवयीन मुलांवर वर्चस्व गाजवित होता. यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. मंगळवारी रात्री संदीप हा साथीदारांसह परिसरात असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेला. यावेळी अल्पवयीन गुन्हेगारही तेथे होते. एका अल्पवयीन गुन्हेगाराने मुलीची छेड काढली. त्यामुळे संदीप व त्याच्यात वाद झाला. अल्पवयीन गुन्हेगार साथीदारांसह तेथून बाहेर गेले. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून मध्यरात्री संदीप हा त्याच्या दोन साथीदारांसह राजीवनगर भागात उभा होता. यावेळी दोन अल्पवयीन मारेकरी व त्याचे पाच साथीदार तेथे आले. वाद मिटविण्याच्या बहाण्याने ते संदीपला टेकडीवर घेऊन गेले. टेकडीवर पोहोचताच त्यांनी संदीपला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण होत असल्याचे बघून संदीपचे साथीदार तेथून पसार झाले. मारहाणीत संदीप खाली कोसळला. एका अल्पवयीन गुन्हेगाराने त्याच्या डोक्यावर दगड घातला. यात संदीपचा जागीच मृत्यू झाला. मारेकरी पसार झाले.

दरम्यान, परिसरातील एका नागरिकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी संदीपचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. एका तासात पोलिसांनी दोन अल्पवयीन मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन गणेशला अटक केली. अल्पवयीन मारेकऱ्यांविरुद्ध हत्या, चोरी, लुटमार व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

अधिक वाचा : राज्यातील खासगी व विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात हवे आरक्षण