पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या आयातीवर देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे हा वाढता खर्च कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली हे चार जिल्हे आपण लवकरच डिझेलमुक्त करून तेथे बायोडिझेल, इथेनॉलच्या वापरास प्रोत्साहन देणार असल्याची घोषणा गुरुवारी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. साखर उद्योगाला सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे साखर कारखान्यांनी केवळ साखरेचे उत्पादन न करता इतरही पूरक उत्पादनांचे म्हणजे इथेनॉल, वीजनिर्मिती, शुगर फ्री साखरेचे उत्पादन करावे तरच कारखानदारी टिकेल असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच पूरक उत्पादनांसाठी राज्य बँकेने कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे असे आवाहनही गडकरी यांनी केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच कृषीमाल सहजपणे परदेशात निर्यात करता यावा म्हणून आपण नाशिक, सांगली, सोलापूर आणि वर्धा येथे ड्रायपोर्ट तयार करणार असून ती मोठ्या बंदरांना जोडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पटील, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, प्रशासक मंडळाचे सदस्य संजय भेंडे, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते.
वर्धा, नागपूर आणि बुलढाणा या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सध्या आर्थिक अडचणीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या बँका लवकरच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य संजय भेंडे यांनी दिली. त्यामुळे या बँकांच्या ग्राहक आणि सभासदांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अधिक वाचा : दिव्यांगांचे तिसरे साहित्य संमेलन उद्यापासून; मकरंद अनासपुरे उद्घाटक