नागपूर : प्रेम तर केले परंतु लग्न करायचे नाही, या नादात तरुणाने विवाहितेची हत्या केली. ही घटना भिवापूर तालुक्यातील नांद शिवारात १९ तारखेला घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या सात दिवसानंतर हे प्रकरण समोर आले असून या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्मिला गजानन धरणे (वय ४२, रा. नांद) असे मृत महिलेचे, तर रोशन देवके, सुनील ढोणे, सचिन दरत (सर्व रा. नांद), अशी आरोपींची नावे आहेत.
उर्मिला ही विवाहित असून तिला दोन मुली आहेत. दरम्यान, आरोपी रोशनसोबत तिला प्रेम जडले. गेल्या चार वर्षांपासून उर्मिला व रोशन यांचे हे प्रेमप्रकरण सुरू होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या पतीने तिला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर रोशन आणि उर्मिला हे लग्न करण्याच्या तयारीत होते. परंतु, रोशनच्या कुटुंबियांचा याला विरोध होता. १८ मे रोजी रोशन हा उर्मिलासह आपल्या घरी गेला असता त्याच्या कुटुंबीयांनी या दोघांनाही घरातून हाकलून लावले. यानंतर ते दोघेही काही दिवस बेपत्ता होते. दरम्यान रोशन हा गावात दिसत असताना उर्मिला कुठे आहे, असा प्रश्न तिच्या कुटुंबियांना पडला. यामुळे त्यांनी याबाबत रोशनकडे चौकशी केली असता त्याने थातूरमातूर उत्तरे देऊन, ‘मला याविषयी काहीच माहिती नाही’, असा पवित्रा घेतला. त्यानंतर उर्मिलाच्या कुटुंबीयांनी उर्मिला बेपत्ता असल्याबाबत भिवापूर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताना रोशनवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत जो प्रकार समोर आला तो एकदम धक्कादायक होता.
रोशन याने सुरुवातीला गळा दाबून उर्मिलाची हत्या केली. नंतर शेतातीलच एका झाडावर तिचा मृतदेह लटकवून तिने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला होता. परंतु, या प्रकरणातील आरोपी सुनील व सचिन यांनी, ‘ही आत्महत्या दिसत नसून हत्या दिसत आहे’, असे रोशनला सांगितले. त्यामुळे तिन्ही आरोपींनी एका बंडीमधून पूर्वी उर्मिलाचा मृतदेह रोशन याच्या शेतात नेला. तिथे खड्डा खोदून उर्मिलाचा मृतदेह पुरला. ही बाब चौकशीत सामोर येताच पोलिसांनी रोशन व त्याच्या दोन साथीदारांना सोबत घेऊन सोमवारी सकाळी घटनास्थळ गाठले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून घटनास्थळावर पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भिवापूर पोलिस करीत होते. तिन्ही आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. मंगळवारी त्यांना कोर्टात हजर करीत पोलिस कोठडी घेऊन पुढील तपास पोलिस करणार आहेत.
अधिक वाचा : नारा घाट के पास झोपड़पट्टी में भीषण अग्निकांड, 6 गैस सिलेंडर फटे, 11 झोपड़ियां खाक