नागपूर : दैनंदिन कामातून उसंत घेत मंगळवारी (ता. २) नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनपा च्या सिव्हील लाईन मुख्यालयाचा परिसर हातात झाडू, फावडे घेऊन स्वच्छ केला. बाह्य परिसरासोबतच इमारतीच्या आतील कार्यालयातही कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करून नवा आदर्श नागपूरकरांसमोर ठेवला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून आज सकाळी ८ वाजता मनपा सिव्हील लाईन मुख्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी कार्यालयात हजर झाले. ‘स्वच्छता ही सेवा’ ह्या राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या समारोपाच्या निमित्ताने सर्वच कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेतला. विविध विभागाच्या विभागप्रमुखांच्या नेतृत्वात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेचे नेतृत्व सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी केले. प्रत्येक विभागाची टीम तयार करण्यात आली. या टीमला सिव्हील लाईन मुख्यालय परिसराचा एक-एक भाग स्वच्छतेकरिता देण्यात आला. मुख्यालयाबाहेरील फुटपाथ स्वच्छतेचीही जबाबदारी एका टीमला देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीसमोरील आणि बाजूचा परिसर, मनपा मुख्यालयाच्या जुन्या इमारतीसमोरील परिसर, आरोग्य विभाग आणि उद्यान विभाग, नागरी सुविधा केंद्र असलेल्या दोन्ही इमारतींचा परिसर, अग्निशमन विभाग इमारतीसमोरील परिसर, पार्किंग, उद्यान आदी ठिकाणी प्रारंभी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या विभागात स्वच्छता मोहीम राबविली.
सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या स्वच्छता मोहिमेत कार्यकारी अभियंता सर्वश्री संजय जयस्वाल, राजेश भूतकर, गिरीश वासनिक, अविनाश बाराहाते, अमीन अख्तर, आसाराम बोदिले, अनिलकुमार नागदिवे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. आतिक खान, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, कारखाना विभागाचे योगेश लुंगे, निगम अधीक्षक मदन सुभेदार, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक आयुक्त विजय हुमणे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, दिलीप तांदळे, कामगार नेते राजेश हाथीबेड, डोमाजी भडंग, दिलीप देवगडे, आर.जी. खोत, गौतम गेडाम, शेषपाल हजारे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.
गांधीजींच्या तैलचित्राला मालार्पण
तत्त्पूर्वी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन केंद्रीय कार्यालयातील महापौर कक्षात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
झोन कार्यालय आणि प्रभागातही स्वच्छता अभियान
महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत दहाही झोन कार्यालयात आणि विविध प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सर्व झोन सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही यामध्ये सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मनपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सतरंजीपुरा झोनमध्ये उपमहापौर दीपराज पार्डीकर, सभापती यशश्री नंदनवार, नगरसेविका अभिरुची राजगिरे, मनिषा कोठे, शकुंतला पारवे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, झोन सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, मंगळवारी झोनमध्ये सभापती संगीता गिऱ्हे, कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, झोन सहायक आयुक्त हरिश राऊत, आसीनगर झोनमध्ये झोन सभापती वंदना चांदेकर, आमदार डॉ. मिलिंद माने, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, लकडगंज झोनमध्ये झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेविका कांता रारोकर, जयश्री रारोकर, वैशाली रोहणकर, झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव यांच्यासह आपुलकी वस्ती सुधार संस्था, स्वरांजली वस्ती सुधार संस्था, गजानन बचत गट या स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या.
नेहरूनगर झोनअंतर्गत ताजबाग परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये झोन सभापती रिता मुळे, क्रीडा सभापती नागेश सहारे, नगरसेविका स्नेहल बिहारे, ताजबाग ट्रस्टचे प्रशासक कुबडे, माजी नगरसेवक अमान, झोन सहायक आयुक्त राजेश कराडे सहभागी झाले होते. धंतोली झोनअंतर्गत विविध प्रभागात तीन ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सभापती विशाखा बांते, नगरसेविका हर्षला साबळे, सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह अन्य नगरसेवक मोहिमेत सहभागी झाले होते.
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत कामागार कॉलनी येथे सहायक आयुक्त सुवर्णा दखने यांच्या नेतृत्वात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व अधिकारी, कर्मचारी, झोनल अधिकारी, आरोग्य निरीक्षक यामध्ये सहभागी झाले होते. अन्य झोनमध्येही संबंधित झोन सभापती, प्रभागातील नगरसेवक व सहायक आयुक्त सहभागी झाले होते.
अधिक वाचा : नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिडांगणे विकसित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस