नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिडांगणे विकसित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

नागपूर : नागपूर शहराला महान खेळाडू, क्रीडा संघटक व क्रीडा प्रशिक्षकांची उज्ज्वल परंपरा लाभली असून विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर शहर व जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणारी क्रीडांगणे विकसित करण्यात येणार असल्याचे तसेच यासाठी भरीव निधीही उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कविवर्य सुरेश भट सभागृह येथे खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागो गाणार, लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष विकी कुकरेजा, माजी खासदार दत्ता मेघे, माजी महापौर अटलबहादूर सिंग, माजी महापौर कुंदाताई विजयकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी नागपूरचे माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचा क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नागपूर क्रीडा महर्षी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खेळाच्या माध्यमातून सुदृढ व निकोप समाजाची निर्मिती होत असून खेळामुळेच खिलाडूवृत्ती व चिकाटी निर्माण होते. नागपूर शहराला नामवंत खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांची उज्वल परंपरा लाभली असून नागपूर क्रीडानगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंनी यश मिळविण्यासाठी नागपुरातील क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटक अथक परिश्रम घेत आहेत. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही देशातील खेळाडूंनी दर्जेदार प्रदर्शन केले. हे सर्व खेळाडू ग्रामीण भागातून पुढे आलेले व प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपले स्वप्न पूर्ण केलेले खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंनी देशाचा गौरव वाढविला आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर येथे भव्य क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही बाब नागपूरसाठी निश्चितच गौरवास्पद आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. ‘साई’सह मानकापूर तसेच शहर व जिल्ह्यातील विविध क्रिडांगणे विकसित करुन ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविण्यावर भर देण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले, कला, शिक्षण, संस्कृती तसेच क्रीडा यासह समाजातील सर्वच क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत असून याअंतर्गतच खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांनी उत्साहाने सहभाग घेतला व सहकार्य केले व हा क्रीडा महोत्सव यशस्वी केला. नागपूर शहर व जिल्ह्यात अनेक क्रीडांगणे असून या क्रीडांगणांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून याअंतर्गत ‘साई’चे अत्याधुनिक सुविधा असणारे मोठे क्रीडा प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे उभारण्यात येत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठीही विविध प्रकारच्या क्रीडा सुविधा उभारण्यात येणार आहेत. नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात अटलबहादूर सिंग यांचे योगदान अतुलनीय असल्याचे गौरवपूर्ण उद्गारही श्री.गडकरी यांनी काढले.

यावेळी विजय मुनीश्वर – पॅराऑलम्पिक, संजय (भाऊ) काणे – ॲथलेटिक्स, सलिम बेग – फुटबॉल, सी.डी.देवरस – बॅडमिंटन, सितारामजी भोतमांगे – कुस्ती, एस.जे.अँथोनी – मॅरेथॉन, लखिरामजी मालविय – जलतरण, बळवंत देशपांडे (बाबा) – स्केटिंग, यशवंत रामू चिंतले (गुरुजी) – कॅरम, त्रिलोकीनाथ सिध्रा – हॉकी, अरविंद गरुड – बॉस्केटबॉल, डॉ.विजय दातारकर – खो-खो, शरद नेवारे – कबड्डी, अनुप देशमुख – बुद्धीबळ, डॉ.दर्शन दक्षिणदास –लॉन-टेनिस, दिनेश चावरे – बॉडी बिल्डिंग, सुनील हांडे – व्हॉलीबॉल, अविनाश मोपकर – टेबल-टेनिस, अनिरुद्ध रईच – सायकलिंग, सुहासिनी गाडे – महिला क्रिकेट या क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संघटकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक व लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. पुढील वर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन 12 ते 27 जानेवारी 2019 दरम्यान करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. आभार माजी महापौर प्रवीण दटके यांनी मानले.

अधिक वाचा : भरतनगर चौक झाला आता ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार चौक

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

International Dance Day 2024 : Date History Significance Wishes & Quotes..

April 29th of every year is known as World...

Complex Thumb Re-plantation Surgery at Krims Hospital – A Remarkable Medical Achievement

Nagpur: A remarkable medical feat unfolded at KRIMS Hospital...

10 Best Cafe Restaurants in Nagpur 2024

Nagpur, a city in Maharashtra, is well-known. It's not...