नागपूर : शहरातील झाडांनी मोकळा श्वास घ्यावा यासाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले. दरम्यान, रस्ता रुंदीकरणामुळे अस्तित्व धोक्यात आलेल्या एका वडाच्या झाडाला वाचविण्यासाठी आयुक्तांची सुरू असलेली धडपड लक्षात घेता पर्यावरणप्रेमींनीही ते झाड वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
अंबाझरी बगिच्याच्या समोरील भागात सुमारे १५० वर्षे जुने वडाचे झाड आहे. चार वर्षांपूर्वी बगिच्यासमोरील रस्त्याचे रुंदीकरण झाले. रस्ता रुंदीकरणात झाडाखालील माती निघाली आणि झाडाची मुळं बाहेर निघू लागली. दरवर्षी पावसाळ्यात झाडाच्या बुंध्याभोवतालची माती वाहून जाऊ लागली आणि या झाडाचे अस्तित्वच धोक्यात आले. मुळं बाहेर आल्यामुळे झाड जगण्याची शक्यता मावळू लागली. शिवाय झाड कोसळण्याचा धोकाही निर्माण झाला.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने ही बाब आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून दिली. आयुक्तांनी स्वत: ह्या झाडाची पाहणी केली. वडाचे ‘ते’ झाड वाचविण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात त्यांनी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्याशी चर्चा केली. झाडाच्या भोवताल लहान भिंत बनवून त्यामध्ये माती आणि खत टाकले तर झाड जगू शकेल, असा उपाय श्री. चॅटर्जी यांनी सुचविला. आयुक्त अभिजीत बांगर यांनी या सूचनेवर लगेच अंमल करीत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यानुसार निर्देश दिले. या निर्देशानुसार मनपाच्या उद्यान विभागाने झाडाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांचे वृक्षप्रेम यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले असून त्यांच्या पर्यावरणवादी दृष्टिकोनामुळे दीडशे वर्षे जुन्या वडाच्या झाडाला जीवदान मिळणार आहे.
अधिक वाचा : नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरच