नागपूर : उपराजधानीच्या मध्यभागी ‘मल्टी मॉडेल हब’ उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी मध्यवर्ती कारागृह तसेच भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला रिंग रोडवर स्थानांतरित करण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ‘एनएचएआय’कडून (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) उचलण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
गडकरी यांनी शुक्रवारी संपादकांशी चर्चा करताना ही माहिती दिली. ‘मल्टी मॉडेल हब’मध्ये रेल्वे, बस व मेट्रो या वाहतूकसेवांना एकाच छताखाली आणले जाईल. अजनी रेल्वेस्थानकालादेखील याच्याशी जोडण्यात येईल. यासोबतच तेथे अत्याधुनिक मार्केट व कार्यालयेदेखील असतील. सर्व सुविधा असलेले हे ‘हब’ शहराचा गौरव बनेल. यासाठी मध्यवर्ती कारागृह तसेच भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामांची जागा देण्यात येईल. दोघांनाही रिंग रोडवर स्थानांतरित करण्यात येईल. या प्रक्रियेत मध्यवर्ती कारागृहावर कुठलेही आर्थिक ओझे येणार नाही. ‘मल्टी मॉडेल हब’ विकसित करणारी एजन्सी ‘एनएचएआय’ हीच नवीन कारागृहदेखील तयार करून देईल, असे गडकरी यांनी सांगितले.