WhatsApp Pay येताच NPCI ने घातली UPI ट्रान्झॅक्शनवर मर्यादा

WhatsApp update lets you write a description for your group chat

भारतात आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन फक्त संवादच नाही, तर आर्थिक व्यवहारही करता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयनं गुरूवारी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी दिली आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवरुन पैसेही पाठवता येणार आहेत. मागील काही वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याची सुविधा सुरू होणार असल्याची चर्चा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. WhatsApp UPI आधारित ही पेमेंट सेवा असून, यापूर्वीच तिची चाचणीही झालेली आहे.

WhatsApp Pay लाँच होताच NCPI ने युपीआय ट्रान्झॅक्शनसाठी मर्यादा घालण्याचीही घोषणा केली आहे. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात युपीआय ट्रान्झॅक्शन्स होत आहे. एका महिन्यात जवळपास २ अब्ज युपीआय ट्रान्झॅक्शन झाली आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार थर्ड पार्टी अ‍ॅप्सना संपूर्ण युपीआय ट्रान्झॅक्शनच्या केवळ ३० टक्केच मिळणार आहे. Google Pay आणि PhonePay यांसारखे अ‍ॅप्स थर्ड पार्टी अ‍ॅप्समध्ये येतात.

थर्ड पार्टी अ‍ॅप्सना युपीआय ट्रान्झॅक्शनच्या केवळ ३० टक्के ट्रान्झॅक्शन्स करता येणार आहेत. रिस्क मॅनेजमेंट आणि वाढत्या युपीआय पेमेंटकडे पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. “युपीआय ट्रान्झॅक्शन आता दर महिन्याला दोन अब्जांपर्यंत पोहोचले आहेत. तसंच भविष्यात यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच भविष्याकडे पाहता एकूण क्षमतेच्या ३० टक्केच वापराची परवानगी थर्ट पार्टी अ‍ॅप्सना देण्यात आली आहे,” असं एनसीपीआयनं सांगितलं.

काय आहे WhatsApp Pay?

भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर वापरकर्त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंटचा पर्याय असेल, तर त्याचा वापर करता येणार आहे. हा पर्याय नसेल तर व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून हा पर्याय बघता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याजवळ डेबिट कार्ड असणं अनिवार्य आहे. हे डेबिट कार्ड UPIला सर्पोट करणार हवं. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट पर्यायावर जाऊन बँकेची निवड करायची आहे. त्यानंतर माहिती भरून सेवा सुरू करायची आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की,”आजपासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याचा अनुभव मेसेज पाठवण्या इतकाच सोप्पा असेल,” असा दावा कंपनीनं केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्यानं UPI वर आधारित पेमेंट सिस्टिम तयार केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट सेवेसाठी पाच मोठ्या बँकांसोबतही करार केला आहे. यात ICICI bank, HDFC bank, Axis bank, SBI आणि JIO Payments bank यांचा समावेश आहे.

इतकंच नाही, तर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हॉट्सअ‍ॅपलाच पैसेच येणार नाही, तर UPI सिस्टीमला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अ‍ॅपवर पैसे पाठवता येणार आहे. म्हणजे समोरची व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करत नसेल तरीही त्याला पैसे पाठवता येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप म्हटल्याप्रमाणे पैसे पाठवणं सुरक्षित असणार आहे. कारण प्रत्येक व्यवहारासाठी UPI पिन अनिवार्य असणार आहे. WhatsApp payments अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यासाठी फक्त अ‍ॅप अपडेट करावं लागणार आहे.