नागपूर : समता सहकारी बँकेच्या १४२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात राज्य गुन्हे विभागाने (सीआयडी) महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम कलम ३ अन्वये (एमपीआयडी) गुन्ह्यात वाढ केली आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
२००६ मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. २००७ मध्ये सीताबर्डी पोलिसांनी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी व कर्जदार आदींसह ५६ जणांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. २०१० मध्ये या घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. २०१० ते २०१७ या कालावधीत सुमारे १५ हजार ठेवीदारांचे ३८ कोटी रुपये परत करण्यात आले होते, असे कळते. कर्जाची परतफेड करून घेण्यासाठी काही ठेवीदारांची संपत्तीही जप्त करण्यात आली होती. या घोटाळ्यात ३३ हजार ५२५ गुंतणूकदारांची फसवणूक झाली.
अनेक गुंतवणूकदारांना अद्यापही त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. काही गुंतवणूकदारांनी अद्यापही सीआयडीकडे संपर्क साधलेला नाही. सीआयडीने त्यांचा शोध सुरू केला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस लाइन टाकळीतील जाफरनगर येथील सीआयडी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक मनोहर हारपुडे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात केले आहे.
अधिक वाचा : Student Of The Year 2 Movie Review : Tiger Shroff, Ananya Panday, Tara Sutaria’s Film Flunks The Test