नागपूर- धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्राच्या दिशेने नेण्यासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा कट रचला जात आहे. हा पुन्हा एकदा विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीला लादण्याचा प्रयत्न आहे. हा डाव रचणाऱ्यांनी इतिहासाची पाने चाळून पहावीत. त्याच आधारावर विचार केला तर आर्य हे देशातील पहिले घुसखोर असून, आधी त्यांना बाहेर काढा,’ असा सूर संविधान चौकात सर्वपक्षीय समितीने केलेल्या आंदोलनात मंगळवारी उमटला. यावेळी झालेल्या घोषणाबाजीने सारा आसमंत दणाणून गेला.
केंद्र सरकारच्या सीसीए, एनआरसी आणि एनपीआर विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, देशाला हिंदूराष्ट्र बनविण्याच्या कटाविरोधातली लढाई अनेक वर्षे थांबली होती. मात्र, २०१४ नंतर ती पुन्हा सुरू झाली आहे. ही लढाई आधीच सुरू व्हायला हवी होती. संविधान मानणारे आणि न मानणाऱ्या दोन छावण्यांमध्ये देश विभागला जात असून, तो वर्गीय पातळीवर आला आहे. हा मूल्यसंघर्ष आहे. समता की विषमता, द्वेष की करुणा-प्रेम, यापैकी कशावर देशाची वाटचाल करायची, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. या विधेयकाविरोधात एकवटलेली तरुणाई पाहाता फॅसिझमच्या अस्ताची चाहूल लागली आहे. देशात ७० वर्षे जे घडले नव्हते, ती क्रांती सुरू झाली असून, देशातील सर्व विद्यापीठांत शिकणारे विद्यार्थी एकवटत असून, धर्म राष्ट्रवाले उघड्यावर पडतील.’
हा धागा पकडत रूपाताई कुळकर्णी म्हणाल्या, संविधानाचे महत्त्व अबाधित आहे, हे माहित असूनही देशातील केंद्र सरकारकडून नागरिकता हिसकावण्याचा घाट घातला जात आहे. हे सरकार रात्रीच्या वेळी निर्णय घेऊन देशाला अंधारात ठेवत आहे. नोटाबंदी, ३७० कलम, गोवंश बंदी कायदा आणि एनसीआर, नागरिकत्व सुधारणा कायदा रातोरात बदलून सरकार काय सिद्ध करत आहे? सरकारला कर आकारताना ओळख म्हणून मतदार नोंदणी कार्ड, आधार कार्ड, पॅन नंबर चालते. पण मूलभूत अधिकार देताना चालत नसेल, तर हा मोठा कट आहे.’
यावेळी जावेद पाशा कुरेशी, जिंदा भगत आदी उपस्थित होते.