कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भारतभरात थैमान घातलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याच्या लाटेत अनपेक्षितपणे जास्तीत जास्त तरूणांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. अशातच एक दुर्वैवी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे निधन झालं. जगदीश हे केवळ ३४ वर्षांचे असताना कोरोनानं त्यांचा बळी घेतला असून बडोद्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जगदीश यांच्या निधनाने त्यांचे नातेवाईक आणि बॉडीबिल्डिंग विश्वातील सगळ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. जगदीश हे नवी मुंबईत वास्तव्यात होते. गेल्यावर्षीच त्यांनी बडोद्यात व्यायामशाळा उघडली होती. त्यामुळे जास्तीजास्त वेळ जगदीश बडोद्यात असायचे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचार सुरू असतानाच शारीरिक स्थिती गंभीर झाल्याचं त्यांचा मृत्यू झाला.
कमी वयात बॉडी बिल्डींगला केली होती सुरूवात जगदीश लाड यांनी फार कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे पुरस्कार मिळवत या क्षेत्रात आपले वेगळे स्थान प्राप्त केले. अनेक तरूणांसाठी जगदीश हे प्रेरणास्थान होते. त्यांनी नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकं मिळवली होती. इतकंच नाही तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी कांस्य पदक मिळवलं होतं.
जगदीश यांच्या निधनानंतर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दुःख व्यक्त केलं आहे. एक नावाजलेला चेहरा गेल्याने बॉडीबिल्डिंग विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. जाता जाता आपण फिट आहोत, आपल्याला काहीही होणार नाही असं समजत असलेल्या लोकांनाही धोक्याची सुचना देऊन गेले आहेत.