सीमेवरील घुसखोरी रोखणारं RISAT-2B सॅटेलाइट लॉन्च

नागपूर : इस्रोने आज पीएसएलव्ही-सी४६ सोबत RISAT-2B हा अत्यंत महत्त्वाचा उपग्रह अंतराळात लॉन्च केला. पृथ्वीची निगराणी करणाऱ्या या उपग्रहाद्वारे भारत-पाकिस्तान सीमेवर वॉच ठेवण्यात येणार असून सीमेपलिकडून भारतात होणारी घुसखोरीही रोखता येणं शक्य होणार आहे. याशिवाय शेती, वन आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

आज पहाटे ५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLVC46चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. त्यानंतर PSLVC46ने पृथ्वीची निगरानी करणाऱ्या RISAT-2B या उपग्रहाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीपणे सोडलं. रीसॅट-२बीमुळे हवामानाचा अंदाज घेता येणार आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटाचा सामना करणं सोपं जाणार आहे. रीसॅट-२बी सोबतच सिंथेटिक अपर्चर रडारही अंतराळात लॉन्च करण्यात आलं आहे. त्याचा दूरसंचार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, हा उपग्रह अंतराळात सोडण्यापूर्वी इस्रोचे चेअरमन के. सीवन यांनी तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात जाऊन पूजा केली होती. कोणत्याही उपग्रहाला अवकाशात सोडण्यापूर्वी तिरुपतीच्या वेंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्याची इस्रोची परंपरा असल्याने ही पूजा करण्यात आली.

> या उपग्रहाद्वारे अंतराळातून जमिनीवरील ३ फुटापर्यंतचे फोटो घेता येणार आहेत.

> मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर या सीरिजचे सॅटेलाइट विकसित करण्यात आले होते.

> या उपग्रहाचं वजन ६१५ किलोग्रॅम आहे, प्रक्षेपणानंतर हा उपग्रह १५ मिनिटाने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडण्यात आला.

अधिक वाचा : DTE takes initiative to reduce vacancies in Polytechnics