नागपूर शहरात मिनी बसेस धावणार

नागपूर : शहरातील दाटीवाटीच्या रस्त्यावरूनही आता महापालिकेची मिनी आपली बस धावताना दिसणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने यासाठी खास २१ आसनी मिनी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मिनी बसेस पुढील आठवड्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शहरातील १८ अशा अत्यंत अरुंद व गर्दीच्या मार्गावर या बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला ५ मिनी बसेस धावणार आहे. त्याचबरोबर रेल्वेस्थानक आणि सीताबर्डी येथूनही नियमितपणे या बसेसच्या माध्यमातून प्रवासी व नागरिकांना सेवा देण्याचा विचार महापालिका करत असल्याचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले. आपली बस सेवेअंतर्गत महापालिका ४५ मिनी बसेस सुरू करण्याचा विचार करीत आहे. यासंबंधीचा निर्णय परिवहन समितीने मार्च २०१७ मध्ये घेतला होता.

विशेष म्हणजे ही सेवा सुरू करण्याबाबत तिन्ही रेड बस ऑपरेटरर्सनी समर्थता दर्शवली होती. शहरात सध्या बससेवेची जबाबदारी स्मार्ट सिटी ट्रॅव्हल्स, नवी दिल्लीची आर. के. सिटी बस ऑपरेशन आणि पुण्याच्या ट्रॅव्हल टाइम कार रेंटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे आहे. या तिन्ही कंपन्याही मिनी बससेवा सुरू करण्याबाबत इच्छुक आहे. शहरात गर्दी व दाटीवाटीच्या वस्तींमध्ये मिनी बसेस असाव्यात यासाठी परिवहन सभापती बंटी कुकडे सुरूवातीपासूनच आग्रही होते. त्यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सतत यासाठी पाठपुरावा केला होता विशेष. मिनी बसेसला टप्प्याटप्प्याने रस्त्यावर आणण्यात येणार आहे.

आरटीओमध्ये गेल्या आठवड्यात पाच बसेसची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. महिनाअखेरपर्यंत आणखी ४० बसेस येणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व ४५ मिनी बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. या मिनी बससेवेच्या माध्यमातून महापालिकेच्या निधीची बचत होणार आहे. सध्या महापालिकेला मोठ्या बस सेवेच्या एका फेरीकरता प्रति किलोमीटर ४९, तर मिडी बसकरीता प्रति किलोमीटर ४५ रुपये ऑपरेटरला द्यावे लागतात. मात्र, मिनी बससेवेमुळे केवळ ३५ रुपये प्रति किलोमीटर द्यावे लागणार आहेत.

मिनीबसचे मार्ग

– सीताबर्डी ते कामठी व्हाया मोमीनपुरा

– पिपळा फाटा ते गांधीबाग

– सीताबर्डी ते न्यू नरसाळा

– सीताबर्डी ते शांती नगर व्हाया मेडिकल कॉलेज

– सीताबर्डी ते शेषनगर

– सीताबर्डी ते वंजारी ले-आऊट

– रेल्वे स्थानक ते सीताबर्डी

प्रवासी क्षमता

मिनीबस

२१ आसन | ५ उभे प्रवासी

मिडीबस

३१ आसन | ८ उभे प्रवासी

मोठ्या बस

४४ आसन | ११ उभे प्रवासी

भविष्यातील तरतूद

– रेल्वे स्थानक ते सीताबर्डी २४ तास सेवा

– लॉ कॉलेज चौक ते खामला शटल सेवा

– छत्रपती ते एअरपोर्ट साऊथ शटल सेवा

अधिक वाचा : Metro dream defaces the ground below in Ambazari stretch