नागपूर : शहरातील उत्तर अंबाझरी आणि वर्धा मार्गावरील मेट्रो मार्गालगतच्या घरांची तीन मीटर जागा पदपथासाठी महापालिका अधिग्रहीत करणार असून तशा नोटीसही घरमालकांना पाठवण्यात आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे, घरमालकांना या जागेचा मोबदला मिळणार नाही.
शहरात सध्या ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्य नगर या दरम्यान मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गालगतचे रस्ते अरुंद झाले असून काही ठिकाणी पदपथही मेट्रोच्या कामासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते आणि नवीन पदपथ तयार करण्यासाठी महापालिकेने मेट्रोमार्गालगतच्या घरमालकांना त्यांची तीन मीटर जागा महापालिकेला देण्यासंदर्भात नोटीस पाठवल्या आहेत. उत्तर अंबाझरी आणि वर्धा रोडवरील घर मालकांनाना यासंदर्भात नोटीस प्राप्त झाले आहेत. १ जुलैला पाठवलेल्या या नोटीसवर नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांची स्वाक्षरी आहे. मेट्रो कॅरिडोरअंतर्गत येणाऱ्या भूखंडासमोरील ३ किमी. रुंदीची जागा पदपथ मार्गासाठी नि:शुल्क द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाच्या ९ जून २०१७ च्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे.
दरम्यान, या जमीन अधिग्रहणाला उत्तर अंबाझरी मार्गावरील घरमालकांनी विरोध केला आहे. या नागरिकांनी ही जागा भाडेपट्टीवर घेतली होती व त्यासाठी रक्कमही शासनाला दिली होती. आता निशुल्क जागा कशी द्यायची असा सवाल या नागरिकांनी केला आहे. पीडित घरमालकांची २२ जुलै रोजी बैठक झाली. त्याला अजित दिवाडकर, एन.सी. चांडक, अॅड. श्रीधर पुरोहित, सेनाड यांच्यासह इतरही नागरिक उपस्थित होते, असे महापालिकेची नोटीस प्राप्त झालेले दिवाकर टोळे यांनी कळवले आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील घरे अनेक वर्षांपासूनची असून त्याच्या संरक्षक भिंती या निर्णयामुळे तोडल्या जाणार आहेत.
काही घरांची अंगणाची जागा जाणार आहे. कष्टाने उभारलेली आणि निवृत्तीनंतरचे दिवस या घरात शांततेने काढण्याचा निश्चय करणाऱ्यांना त्यांच्या घराची जागा जाणे हा धक्का आहे.
अधिक वाचा : नागपूर महानगरपालिका व आयसीएलईआय-एसए मध्ये सामंजस्य करार