उस्मानाबाद : केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम 2019 वगळून) विद्यापीठाने जाहीर केले आहे. यासंबंधीचे अभ्यासक्रम निहाय वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. परीक्षार्थी आणि महाविद्यालयांच्या सोयीसाठी ही परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतली जाईल. कोरोनाच्या संसर्ग काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून गावातच किंवा विद्यार्थी ज्या महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत, त्याच ठिकाणी त्यांची प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वैद्यकीय परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत राज्यपालांना माहिती दिल्याचे, असे अमित देशमुख यांनी सांगितले होतं.
परीक्षेदरम्यान कोणती खबरदारी घेतली जाणार?
केंद्रीय परिषदांचे निर्देश आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार 15 जुलैपासून सुरु वैद्यकीय परीक्षा होणार
– विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात त्यांची प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा होणार
– विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील अभ्यासक्रमाच्या परीक्षा केंद्रांवरही परीक्षा देण्याची सोय केली जाईल
– विद्याशाखा आणि जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांची यादी आठ ते दहा दिवसांमध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाईल.
– कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र बदलता येणार.
– गावातच अथवा शिकत असलेल्या महाविद्यालयात परीक्षा देता येणार.
Also Read- खासगी रुग्णालयांच्या दरांसंदर्भात शासनाची नवी नियमावली