नागपूर : नागपूर महानगरपालिका, महा मेट्रो व जीआयझेड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला नागपूर’ उपक्रमाचा गुरुवारी (ता. १) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुभारंभ झाला. शहरी विकास मंत्रालयातर्फे अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या निमित्ताने ‘पब्लिक आउटरिच डे’ संकल्पनेंतर्गत दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत जपानी गार्डन येथे सकाळी ७ वाजता महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकथॉनला सुरूवात केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपअभियंता राजेश दुपारे, जीआयजी स्मार्ट-एसयूटीच्या प्रोजेक्ट मॅनेजर सारा हॅबरसॅक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालणा देणे व जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत सेमिनरी हिल्स येथील वॉकर्स स्ट्रीट येथे सकाळी विविध फिटनेससंबंधी खेळ, झुम्बा डान्स व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. रामगिरी मार्गावर दिवसभर ग्रीन स्ट्रीट कार्निव्हलमध्ये नागरिकांना नागरी वाहतूक प्रकल्पाची माहिती देण्यात आली. याशिवाय विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी)चे प्रवेशद्वार व श्रद्धानंदपेठ चौकात ‘पॉप अप पार्क’ची संकल्पना राबविण्यात आली. यावेळी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना सायलिंगचे महत्व पटवून देण्यात आले व नागरिकांना सायकल चालविण्याची शपथ देण्यात आली.
वॉकथॉनमध्ये सुंदर बोपवानी, दीपा ठाकूर, रिना शाह, पूजा बजाज विजयी
जपानी गार्डन येथून प्रारंभ झालेल्या २ किमी अंतराच्या वॉकथॉनमध्ये शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जपानी गार्डन येथून सुरू झालेली शर्यत उच्च न्यायालय, शासकीय डाक कार्यालय, वॉकर्स स्ट्रीट मार्गे पुन्हा जपानी गार्डन येथे वॉकथॉनचे समापन झाले. यामध्ये सुंदर बोपवानी व डॉ. दीपा ठाकूर यांनी सर्वात कमी वेळ नोंदवून संयुक्तपणे प्रथम स्थान पटकाविले. तर आर्की. रिना शाह व पूजा बजाज यांनी दुसरे व तिसरे स्थान राखले. सर्व विजेत्यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. वॉकथॉनच्या आयोजनासाठी आर्की. समीर गुजर, सोनाली बोराटे, अपर्णा तरार, प्राची शर्मा आदींनी सहकार्य केले. उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम सायंकाळी चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये पार पडला.
अधिक वाचा : हायब्रिड एअरो बोट नागपुरचा तलावात धावणार : नितीन गडकरी