नागपूर- तब्बल पंधरवड्यानंतर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी महापौर संदीप जोशी यांची अनौपचारिक भेट घेतली. या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. शिष्टाचारानुसार, आयुक्तांनी महापौरांची भेट घ्यावी, असे असताना मनपातील या दोन प्रमुखांची भेट झाली नव्हती. बुधवारी हा योग आला. सुमारे १५ ते २० मिनिटांच्या या भेटीत शहरातील विविध समस्या व प्रकल्पांवर उभयंतांमध्ये चर्चा झाली. आता गुरुवार, १३ फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष सभेकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुंढे हे २८ जानेवारीला मनपात रूजू झाल्यानंतर त्यांची महापौरांशी भेट झाली नव्हती. त्यामुळे अनेक तर्कवितर्क काढले जात होते. पदग्रहणानंतर आयुक्तांनी मेट्रो रेल्वेच्या अॅक्वालाइनच्या लोकार्पण सोहळयात महापौरांशी केवळ हस्तांदोलन केले होते. त्यानंतर महापौर मुंबईत असताना आयुक्त नागपुरात होते. महापौर नागपुरात परतल्यानंतर आयुक्त बैठकीसाठी मुंबईत होते. मधल्या काळात आयुक्त व महापौर दोघेही नागपुरात असताना ही भेट होत नव्हती. त्यामुळे उलटसुलट बातम्या चर्चेत होत्या. आयुक्तांनी महापौरांची भेट घ्यावी, असे नगरसेवकांकडून सांगण्यात येत होते. तर, महापौर हे आयुक्तांशी मोबाइलवर चर्चा झाल्याचे सांगत होते. परंतु, दरम्यानच्या काळात आयुक्त मुंढे यांनी कामाचा सपाटा लावला होता. स्वत:चा ‘जनता दरबार’ही सुरू केला होता. या दरबाराला नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. याच काळात महापौरांचाही ‘जनता दरबार’ सुरू होता. त्यामुळे पुन्हा वेगवेगळया चर्चा सुरू झाल्या. अखेर बुधवारला या दोघांच्याही भेटीनंतर वेगवेगळया चर्चा व तर्कवितर्कांना विराम मिळाला.
गुरुवारी मनपाची विशेष सभा आहे. या सभेत आयुक्त मुंढे हजर असतील. गेल्यावेळी मनपा व नासुप्र यांच्यात नियोजन प्राधिकरणाच्या अधिकारावरून आयोजित विशेष सभा आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे स्थगित करण्यात आली होती. या सभेत नासुप्रबद्दलच्या मनपा सभागृहाच्या भावना आयुक्तांमार्फत राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यात याव्या, अशी सभागृहाची भूमिका आहे.