२१ डिसेंबरला रितेशचा माऊली चित्रपट प्रदर्शित होणार

माऊली

२१ डिसेंबरला रितेशचा माऊली चित्रपट प्रदर्शित होणार

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भक्तीचा सागर लोटला असून, सर्वत्र वातावरणात विठुनामाचाच गजर सुरु आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने अनेक मैलांचा पायी प्रवास करुन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मानातही आपल्या देवाला भेटल्याचा आनंद आहे, तर त्या सावळ्या विठ्ठलाचं रुप पाहून कित्येकांचे डोळे पाणावले आहेत. अशा या सर्व वातावरणात अभिनेता रितेश देशमुख यानेही सर्वांना एक खास भेट दिली आहे.

रितेशने त्याच्या आगामी माऊली या चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्यानंतर पुढच्याच ट्विटमधून त्याने हा पोस्टर सर्वांच्या भेटीला आणला.

या पोस्टरमधून कोणत्याच कलाकाराचा चेहरा स्पष्टपणे दिसत नसला तरीही ‘माऊली’ या नावाला साजेसा हा असाच पोस्टर आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीची सावली स्पष्टपणे दिसत असून, त्या सावलीचा आकार हा ‘कटेवरी कर’ असणाऱ्या विठुमाऊलीप्रमाणेच दिसत आहे. पोस्टवर चित्रपटाचं नावही अगदी कलात्मकपणे छापण्यात आलं असून, कपाळावर लावण्यात येणाऱ्या नामाचं प्रतिबिंबही त्यात पाहता येत आहे.

२१ डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘हिंदुस्तान टॉकीज’च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे. त्यामुळे माऊलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या संगीताने आसमंत दुमदुमणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

अधिक वाचा : मेघा धाडे ठरली पहिल्या मराठी बिग बॉसची विजेती