नागपुर : कोरोना संसर्गाच्या बाबतीत ग्रीन झोनमध्ये असलेला विदर्भातील वर्धा जिल्हा हा भविष्यातही ग्रीन झोन म्हणूनच अबाधित राहावा या करीता वर्धा जिल्हा प्रशासनाने सुरक्षा उपाययोजनांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. वर्धा जिल्ह्याचा हा मास्टर प्लॅन राज्यातील इतर जिल्ह्यांकरीता रोल मॉडेल ठरू शकतो. जिल्ह्यातील विविध भागात असलेली आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंची दुकाने आणि त्यांची मानवी जीवनातील गरज लक्षात घेऊन दुकाने उघडण्यासंदर्भातील हा मास्टर प्लान आहे. राज्यातील रेड झोन आणि ऑरेंज झोन मधील जिल्ह्याकरिता सुध्दा हा मास्टर प्लॅन आदर्श ठरू शकेल.
वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. आतापर्यत पाठविलेले सर्व संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने वर्धा जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील दुकाने उघडण्यासंदर्भात संदर्भात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आदेश काढले आहेत, मात्र शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शहरात गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून वर्धा शहरातील सर्व दुकानं वेगवेगळ्या दिवसाला उघडण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिले आहेत.
शहरातील गर्दीच्या ठिकाणांमध्ये, बजाज चौक ते शिवाजी चौक परिसर, दुर्गा टॉकीज गल्ली, झेंडा चौक ते न्यू इंग्लिश परिसर( अंबिका चौक ते गोल बाजार परिसर), महादेवपूरा परिसर, शास्त्री चौक ते आर्वी नका चौक (बॅचलर रोड दोन्ही बाजू), बजाज चौक ते पोस्ट ऑफिस ( इतवारा परिसर दोन्ही बाजू), याचा समावेश करण्यात आला आहे.
दुकानांचे वर्गीकरण
शहरातील दुकानाचे वर्गीकरण करण्यात आले असून संचारबंदीचा विचार करता सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. यात किराणा, सराफ, ऑप्टिकल, हार्डवेअर, पेंट, टाईल्स, फर्निचर, फोटो फ्रेमिंग, ड्रायक्लिनर, सिमेंट, लोहा, टेलरिंग, कुशन वर्क्स ही दुकाने गुरुवार ते रविवार सुरू राहतील.
ब वर्गातील मोबाईल दुकान, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, स्टेशनरी, गिफ़्ट, जनरल स्टोअर, कापड दुकाने, भांड्याची दुकान, चप्पल-शूज, ऑटोमोबाईल गॅरेज, व स्पेअर पार्ट, प्रिंटिंग, वेल्डिंग, ई- सेवा केंद्र सोमवार ते बुधवार तर क वर्गातील चिकन, मटण, बेकरी, पेट्रोल पम्प, कृषी व कृषीशी निगडित व्यवसाय, भाजी, फळविक्री नगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच दररोज सुरू ठेवता येतील.
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, आईस्क्रीम पार्लर केवळ घरपोच सेवा व काउंटर सेवा सकाळी ७ ते रात्री ९ पर्यन्त सुरू ठेवता येतील. दूध वितरण व घरपोच सेवा सकाळी ७ ते दुपारी २ व संध्याकाळी ५ ते रात्री ८पर्यंत तर औषध दुकाने व हॉस्पिटल सेवा रोज २४ तास सुरू ठेवता येतील.
पान टपरी हात गाडी दुकाने बंद
पान टपरी, चहा दुकान, हात गाडीवरील व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी बगळे यांनी सांगितले.
Also Read- जेईई आणि नीट परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन्ही परीक्षा जुलैमध्ये