मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू झाले असतानाच, आता राज्य सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी विधिमंडळातील सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक विधान भवनात होणार असून, या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून या गटनेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकार आणि मराठा मोर्चाचे संयोजक यांच्यात मध्यस्थी सुरू केली असून, या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याची तयारी दाखवली आहे.
राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी सरकारमधील मंत्री कामाला लागले आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडक सहकार्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य काही मंत्र्यांची ही बैठक शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी झाली. रात्री एक वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. याच बैठकीत विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांना एकत्र आणून त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय घेतला गेला. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल, न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका आणि अन्य मुद्द्यांमुळे आरक्षण देण्यास विलंब लागणार असून, त्याबाबत या गटनेत्यांपुढे परिस्थिती मांडली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे या बैठकीस संबोधित करणार आहेत.
मराठा आरक्षणाची मागणी आणि त्यावरून राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, याबाबत सर्व पक्षांशी चर्चा होणार असून, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा : AIMTC call off their strike after meeting government