नागपूर, ता. २६ : आपल्या भारतासारख्या विशाल देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध धर्माचे असंख्य लोक राहतात. मात्र देशाबाहेर सर्वांची ओळख ही एक भारतीय म्हणूनच पुढे येते ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे, भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता व एकात्मता अखंडता टिकून आहे, त्यामूळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामूळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत महापौर नंदा जिचकार यांनी केले.
भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेत दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्या अनुषंगाने म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये महापौर श्रीमी नंदा जिचकार, उपमहापौर श्री.दिपराज पार्डीकर, सभापती स्थायी समिती श्री.विरेन्द्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते श्री. तानाजी वनवे, म.न.पा आयुक्त श्री. अभिजीत बांगर, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, नगरसेवक किशोर जिचकार, मनोज सांगोळे, संजय हिरणवार यांनी भारतीय घटनेचि शिल्पकार भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. त्यानंतर महापौरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनीसुध्दा संविधान उद्देशिकेचे सामुहिकरित्या वाचन केले.
महापौर पुढे म्हणाल्या, आज संविधानाबाबत जागृती होणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपणाला संविधानाने बहाल केलेले हक्क कळणार नाहीत तोपर्यंत आपल्याला लोकशाहीचा खरा अर्थही कळू शकणार नाही. आपल्या भारताचे संविधान कोणा एका, व्यक्ती अथवा संस्था अथवा धार्मीक बाबीला अर्पण न करता देशातील प्रत्येक नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आले आहे. उद्देशिकेमध्येही ‘आम्ही भारताचे लोक’ म्हणूनच सुरूवात होत आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
यावेळी अपर आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, नितीन कापडनीस, रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अधिक्षक अभियंता मनोज तालेवारी, कार्य. अभियंता सर्वश्री.गिरीश वासनिक, संजय जैस्वाल, सशीष नेरळ, अविनाश बाराहाते, अमिन अख्तर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनिल कांबळे, स्थावर अधिकारी उज्वल धनविजय, पशुचिकित्सा अधिकारी गजेन्द्र महल्ले, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्पलाईजचे अध्यक्ष सुरेन्द्र टिंगणे, राजेश हातीबेड, मनपा मागासवर्गीय संघटनेचे दिलीप तांदळे, विनोद धनविजय, राजकुमार वंजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. यावेळी मनपा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. याप्रसंगी भारतरत्न व संविधानाचे शिल्पकार यांचा जयघोष करण्यात आला.