नागपूर : विदर्भातल्या काही भागांमध्ये पावसाने दडी मारली असली तरी पूर्व विदर्भात समाधानकारक पाऊस झाला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने कीटक आणि डासांमुळे पसरणाऱ्या आजारांनी डोके वर काढले आहे. डासांच्या उद्रेकामुळे एकट्या पूर्व विदर्भात गेल्या आठवड्यात २१३ मलेरियाग्रस्तांची भर पडली आहे. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आढळले आहेत.
पूर्व विदर्भात सध्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांची दहशत आहे. या भागातील गोंदियापासून ते भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हे धानाचा बेल्ट म्हणून ओळखले जातात. सध्या धानाची रोवणी झाल्याने शेतात पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार झाले आहे.
पूर्व विदर्भातील एकट्या गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १४६ मलेरियाग्रस्तांची भर पडली आहे. त्यामुळे चालू वर्षात गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ७६५ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २२९ रुग्ण एकट्या ऑगस्ट महिन्यातील आहेत. चालू महिन्यात आतापर्यंत पूर्व विदर्भात मलेरियाचे ३१९ रुग्ण आढळले आहेत. गडचिरोली पाठोपाठ ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात गोंदियामध्ये मलेरियाग्रस्त रुग्णांची संख्या ५९ वर पोचली आहे. तर चंद्रपुरात ८ रुग्णांच्या रक्ताचे नमुने मलेरियात पॉझिटिव्ह आढळले आहेत. पूर्व विदर्भात वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत मलेरियाचे एकूण ८३९ रुग्ण आढळले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने पूर्व विदर्भात मलेरियाची लक्षणे आढळलेल्या ४८ हजार ३१३ जणांच्या रक्ताचे नमुने तपासले आहेत. आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना केल्याने आतापर्यंत मलेरियाने विभागात केवळ एक जण दगावला आहे.