नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि कोशु-कुंग-फू-स्पोर्ट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान नगर येथील ईश्वर देशमुख सभागृहात आयोजित महापौर चषक कोशु-कुंग-फू कराटे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारली आणि महापौर चषकावर आपले नाव कोरले. द्वितीय स्थान तेलंगाना तर तृतीय स्थान आसामने पटकाविले.
स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि वैयक्तिक गटातील विजेत्यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा सभापती नागेश सहारे, मनपाचे क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, कोशु-कुंग-फू-स्पोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. विनोद राऊत, आयोजन सचिव बाळासाहेब देसाई, श्रीमती ज्योत्स्ना राऊत, सुरेशबाबू चौधरी, हरिष चावला, वंदना श्रीखंडे, नीलेश शेंडे, स्वप्नील भैसारे, मनोहरराव मसाळ, विजय मदनकर, शोभा रहाटे, दिलीप मलिये, राजू शहा, प्रभाकर येवले उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, लोकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासोबतच या शहरात क्रीडा भावना वाढीस लागावी यासाठी नागपूर महानगरपालिका नेहमीच अग्रेसर असते. विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपा पुढाकार घेत आहे. मागील दीड वर्षांत अनेक राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करून मनपाने क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंत खेळाडूंना नागपुरात आणले. यापुढेही अशा स्पर्धांच्या आयोजनासाठी मनपा पुढाकार घेईल, असेही त्या म्हणाल्या.
क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. अन्य मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यानंतर सर्व विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेत महाराष्ट्र, तेलंगाना, दिल्ली, तामीळनाडू, आसाम या राज्यातील सुमारे ५०० खेळाडू सहभागी झाले होते. संचालन जगदीश पाटील यांनी केले.
अधिक वाचा : महापालिकेद्वारे अखिल भारतीय हास्य कवि संमेलनाचे आयोजन