E-Pass : खासगी वाहनानं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असल्यास ई-पास लागेल का? जाणून घ्या…

Police

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानं सरकारनं आजपासून नवी नियमावली लागू केली आहे. या अंतर्गत राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ७ जून म्हणजे आजपासूनच हे नियम लागू असतील. अनलॉक प्रक्रियेबाबत शासकीय स्तरावर निर्णय घेतला असला तरी स्थानिक प्राधिकरणाला निर्बंध हटवावे की ठेवावे हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. मात्र अद्यापही अनेक लोकांच्या मनात आहे की, आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर ई-पास लागेल का? यावर सरकारने स्पष्ट केले आहे की, पहिल्या ४ टप्प्यांमध्ये प्रवास करत असाल तर नियमितपणे वाहतूक सुरू आहे. केवळ ५ व्या टप्प्यातून तुम्ही प्रवास करणार असाल तर त्यासाठी ई पास आवश्यक आहे. सध्यातरी ५ व्या टप्प्यात एकाही जिल्ह्याचा समावेश नाही. पाचव्या स्तरात जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल अशा जिल्ह्यांचा समावेश होईल.

लोकल ट्रेनने प्रवास करू शकता का?

पहिल्या टप्प्यात नियमितपणे लोकलने प्रवास करू शकता. परंतु स्थानिक प्राधिकरण त्यांच्या स्तरावर निर्बंध लागू करू शकतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय व अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल. त्याचसोबत स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांनुसार महिलांनाही प्रवेशास मुभा देण्यात आली आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्तरात केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे.

सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार का?

पहिल्या टप्प्यात नियमितपणे सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात १०० टक्के वाहतूक सुरू राहील. परंतु उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात ५० टक्के सार्वजनिक वाहतूक प्रवास सुरू राहील. इथंही उभं राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तर माल वाहतूक करण्यासाठी ३ जणांना परवानगी असेल. पाचव्या टप्प्यात माल वाहतूक करण्यासाठी ई पासची आवश्यकता आहे.

गर्दी चालणार नाही

नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडलाआमंत्रण देणारी गर्दी , समारंभ, सोहळे चालणार नाहीत आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे असे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) म्हणाले की, दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व बाबी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवायचे आहे.