नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी निकाल जाहीर झाला असून यंदा बारावी बोर्डाचा ८५.८८ टक्के इतका निकाल लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील.
राज्यातील तब्बल ४४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा १२ वीच्या परीक्षेला राज्यभरात एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ४२ हजार ९१९ तर विद्यार्थिनींची संख्या ६ लाख ४८ हजार १५१ इतकी होती.
दरम्यान आयपॅडवर परीक्षा देणाऱ्या निशिका या विद्यार्थिनीला ७३ टक्के गुण मिळाले आहेत. निशिका ही मुंबईतील सोफीया कॉलेजची विद्यार्थीनी आहे.
यंदा इयत्ता १२वीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. यंदा कोकण विभागाचा निकाल ९३. २३ टक्के इतका लागला आहे. तर, पुणे विभागाचा निकाल ८७.८८ टक्के, अमरावती विभागाचा ८७.५५ टक्के, कोल्हापूर विभागाचा ८७.१२ टक्के, लातूर विभागाचा ८६.०८ टक्के, नाशिक विभागाचा ८४.७७ टक्के, मुंबई विभागाचा ८३. ८५ टक्के, तर नागपूर विभागाचा ८२.५१ टक्के निकाल लागला आहे.
शाखेनुसार विचार करता यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९२. ६० टक्के, वाणिज्य शाखेचा ८८. २८ टक्के आणि कला शाखेचा निकाल ७५.४५ टक्के लागला आहे.
रिंकू राजगुरूच्या निकालाबाबत उत्सुकता
सैराट चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू हीनेही यंदा १२वी परीक्षा दिली असून, रुपेरी पडद्यावर यशस्वी ठरलेली रिंकू परीक्षेत कसे यश मिळवते याची उत्सुकता सर्वाांनाच लागली आहे.
मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
अधिक वाचा : बारावीचा निकाल आज होणार जाहीर