राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट आहे, रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ही भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून हे भरतीचे लवकरच आदेश निघतील अशी माहिती आहे.
या आधी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. पण राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी अशी मागणी केली होती. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील अशी आरोग्य विभागाने मागणी केली होती.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्यातील आरोग्य विभागातील अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे.