राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Date:

मुंबईः करोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे करोना लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्यानं मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

१८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. म्हणजेच या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण पणे लसीचे १२ कोटी डोस लागणार असल्याची माहिती आहे. मोफत लसीकरणामुळं राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न                                                                                      सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपलब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.

उत्तम नियोजन करावे                                                                                                              १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे

१ मेला लसीकरण सुरु होणार नाही                                                                                           लस आज आपल्याला लगेच उपलब्ध होत नाहीय. त्यामुळं १ मेपासून लगेचच लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. १८ – ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. लसीच्या कमतरतेमुळं १मेपासून लसीकरण शक्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करणं शक्य नाही. त्यामुळं एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती एक मायक्रोप्लानिंग करणार आहे. त्यामध्ये वयोगटानुसार लसीकरण राबवण्याची चर्चा करण्यात येईल. १८- ४४ वयोगटासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तिथं फक्त याच वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कोविन अॅपवरुन रजिस्टर                                                                                                लसीकरणासाठी जाताना कोविन अॅप वापरुन रजिस्टर करुन मगच केंद्रावर जावं. जे लसीकरण होईल ते कोविन अॅपच्या माध्यमातूनच होईल.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related