महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं (मनसे) पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार पडत आहे. हे अधिवेशन मनसेला दिशा देणारं ठरणारं असून, याच अधिवेशनात मनसे जुना झेंडा रद्द करून नवा झेंडा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. या नव्य झेंड्यातून निळा, हिरवा आणि पाढरा रंग काढून टाकण्यात आला असून नव्या झेंड्यात फक्त भगवा रंगच असणार आहे. उद्याच्या अधिवेशनानंतर मनसे हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मनसे आपल्या नव्या प्रस्तावित झेंड्यावर शिवमुद्रा असेल हे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालं. त्यानंतर त्यांवर अनेकांनी आक्षेपही नोंदवले. मात्र, मनसेने निवडणूक आयोगाकडे दोन प्रकारचे झेंडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांपैकी एक शिवमुद्रा असलेला झेंडा आहे. तर, दुसऱ्या झेंड्यावर मनसेचे निवडणूक चिन्ह असलेले इंजिन दाखवण्यात आले आहे.
फेसबुक, ट्विटरवरील झेंडा हटवला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या फेसबुक आणि ट्टिवरवरील प्रोफाइल फोटोमधील झेंडा हटवला असून त्या जागी फक्त ब्लॅक अॅण्ड व्हाइट इंजिनाचे चित्र ठेवण्यात आले आहे. या प्रोफाइल फोटोची जागा नवा भगवा झेंडा घेणार असून निवडणूक आयोग दोन पैकी कोणत्या झेंड्याला मान्यता देतो, याची वाट मनसे पाहत आहे.
राज ठाकरे कोणती दिशा देणार?
शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी मराठी माणसांच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी पक्षाची स्थापना केल्याची घोषणा केली होती. मराठी माणसासाठी लढण्याचे जाहीर करत असताना त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली होती. त्यानुसारच त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यामध्ये भगव्याबरोबर निळा आणि हिरवा रंगही घेतला होता. मात्र, आता त्यांच्या नव्या झेंड्यात केवळ भगवा रंग दिसणार आहे. हे लक्षात घेत ते आता प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र,. भारतीय जनता पक्षाबरोबरच शिवसेना हा देखील हिंदुत्ववादी पक्ष आहे. असे असताना मनसे हा देखील पूर्णपणे हिंदुत्ववादी राजकारणात उडी घेणार का, किंवा राज ठाकरे यांचे हिंदुत्व भाजप आणि शिवसेनेसारखेच असेल, की ते वेगळे असेल, या प्रश्नांची उत्तरे उद्याच्या पक्षाच्या अधिवेशनात मिळणार आहेत.