राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय. राज्याच्या मुख्य सचिवांकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार सरकारी, खासगी कार्यालये, सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. इतकच नाही तर लग्नासाठी ही आता संख्येचीच नाही तर वेळेचीही मर्यादा घालण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास थोडाथोडका नाही तर तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
2 तासांत लग्न उरका!
यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकच नाही तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावा लागणार आहे. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचटा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
लोकल ट्रेन, मेट्रो, मोनो रेलने कोणाला प्रवास करता येणार?
>> फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेन, मोनो रेल, मेट्रोने प्रवास करण्यास मुभा. सरकारी कर्मचारी असले तरी प्रवासासाठी आयडीकार्ड असणे बंधनकारक असेल
>> सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनासुद्धा लोकलने प्रवास करता येणार आहे. यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल क्लिनिक स्टाफ यांना लोकल, मेट्रो, मोनो रेलने प्रवास करण्यास मुभा असेल.
>> ज्या व्यक्तीला उपचार तसेच आरोग्य विषयक मदत हवी असेल त्यांना सुद्धा प्रवास करता येणार आहे. रुग्णासोबत फक्त एका व्यक्तीला प्रवास करता येणार आहे.
कार्यालयांबाबत नवे नियम काय सांगतात?
1. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.
2. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.
3. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.
जिल्हाबंदीची अंमलबजावणी होणार
नव्या नियमावलीनुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तर तुमच्याकडे ठोस कारण असणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मंजुरी घेणं गरजेचं आहे. तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करुन जाणार असाल तर तुम्हाला 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.