नागपूर: कोल्हापूर आणि सांगलीत आज आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या ४३ वर पोहोचली असून अद्यापही ३ जण बेपत्ता आहेत, अशी माहिती देतानाच कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला असल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीची माहिती दिली. सांगलीत काल रात्री २ तर कोल्हापुरात एक मृतदेह सापडला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील पुरात बेपत्ता झालेल्या तिघांचा अद्यापही शोध लागलेला नाही. आतापर्यंत ४, ७४,२२६ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं असल्याचं म्हैसेकर यांनी सांगितलं.
अतिवृष्टीचा इशारा, पण पाऊस सुरू नाही
कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मात्र अद्याप या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
उद्याच पाच हजार मिळणार
पूरग्रस्तांसाठी राज्यसरकारने तातडीची पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रोख रक्कम उद्याच पूरग्रस्तांपर्यंत पोहोचणार असून ३१३ एटीएम सेंटरमध्ये पैसै भरण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
>> अलमट्टी धरणातून सध्या ५,७०,००० वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे
>> सांगलीत आजूनही बारा गावे, तर कोल्हापूरमध्ये १८ गावे पुराने वेढलेली आहेत. या गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे
>> सोलापूरमधील १६ गावे पाण्याने वेढलेली आहेत
>> पाण्यामुळे बंद असलेले कोल्हापूरमधील ३१ पैकी १५ रस्ते, तर सांगलीत ४५ पैकी १५ रस्ते सुरू करण्यात आले आहेत
>> मुंबई-बंगळुरू महामार्ग फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये पेट्रोल-डिझेल, गॅस आदींचा समावेश आहे
>> पुरामध्ये नुकसान झालेल्या खासगी आणि सरकारी इमारती तसेच घरांचे सर्वेक्षण केले जाईल. आवश्यक असल्यास पुनर्वसनही केले जाणार आहे.