नागपूर- भारतीय कला, संस्कृती व इतिहास यांना जगभरात आदर आहे. महाराष्ट्र व बंगाल या दोन राज्यांचे साहित्य व कला क्षेत्रांमध्ये विशेष योगदान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्थानिक दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे निखिल भारत बंग साहित्य संमेलन संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रदीप भट्टाचार्य उपस्थित होते.
खालावत चाललेली कुटुंब व्यवस्था ही पाश्चात्त्य देशांतील सर्वांत मोठी समस्या आहे. सुसंस्कारीत साहित्य व संस्कृतीमुळे भारतात मूल्याधिष्ठित जीवनपद्धती रुजल्याने अशा समस्यांना भारताला सामोरे जावे लागत नाही, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. अशा साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने नव्या पिढीला सुशिक्षित करण्याबरोबरच सुसंस्कृत करण्यासाठी साहित्य संस्थांनी साहित्य व नवविचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.
भौतिक संरचनापेक्षा सांस्कृतिक संरचना सुद्धा समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी आवश्यक असते. साहित्य, कला संस्कृती यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सुरेश भट सभागृह सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कमी दरात सभागृह उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी एका स्मरणिकेचे प्रकाशन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. निखिल भारत बंग साहित्य संमेलन संस्था १९२३मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारे स्थापन करण्यात आली होती. संस्थेचे शंभरावे वर्ष असून या संस्थेच्या १२० शाखा देशभर पसरलेल्या आहेत. या संस्थेचा उद्देश बंगाली भाषेचे संवर्धन व प्रसार तसेच इतर भाषिक प्रदेशासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे हा आहे. संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून निशुल्क: बांगला भाषेचे प्रशिक्षण सुद्धा देत आहे, अशी माहिती निखिल भारत-बंग साहित्य संमेलनाच्या दक्षिण-मध्य क्षेत्राच्या सहअध्यक्षा मंदीरा गांगुली यांनी दिली.