नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारला मदत व्हावी, म्हणून महामेट्रोने एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सहायता निधीत १२ लाख रुपयांचा धनादेश देणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
करोना विषाणूला रोखण्याकरिता भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. महामेट्रोदेखील प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांकरिता उपाययोजना करीत आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नागपूर व पुणे मेट्रो रेल प्रकल्पाकडून मुख्यमंत्री महाराष्ट्र सहायता निधीमध्ये करोना विरुद्धच्या लढाईसाठी १२ लाखांची मदत स्वरूपात देणार असल्याचे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधीकरिता महामेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी एक दिवसाचा पगार मदतीच्या स्वरूपात देणार आहेत. महामेट्रो येथे सुरुवातीपासूनच स्वच्छतेसंदर्भात विविध उपाययोजना केल्या असून, करोनाचा उद्रेक झाल्यापासून या उपाययोजनांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. विषाणूचा प्रकोप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तींकडे पसरू नये, यासाठी महामेट्रोने आपल्या प्रवासीफेऱ्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवल्या आहेत.
मेट्रो कार्यालय येथे इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे कर्मचाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. कार्यालय, कार्यस्थळ आणि कामगार कॉलनी येथे वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार नियमितपणे साफ-सफाई आणि औषधीची फवारणी करून औषधी आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली जात आहे. याव्यतिरिक्त करोनाच्या बचावापासूनची माहिती स्टेशन सूचनाफलकांवर लावण्यात आली आहे.