नागपूर : दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर अन्य युवकाशी लग्न करणाऱ्या प्रेयसीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमात प्रियकराने धिंगाणा घातला. भावी पतीच्या गळ्यातील हार-तुरे तोडून धुलाई करीत जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीचा भाऊ आणि आईवडिलांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही मारहाण केली. हा थरार रविवारी रात्री आठ वाजता जरीपटक्यात घडला. या घटनेची आज सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटक्यातील २७ वर्षीय युवती मलायका (बदललेले नाव) हिचे आरोपी पुनित एकनाथ राऊत (वय ३०, चटर्जी लेआउट, जरीपटका) याच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या प्रेमसंबंधाला पुनितच्या आईवडिलांचा होकार होकार होता. मात्र, मलायकाच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे मलायकाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न अन्य युवकाशी करून देण्याचे ठरविले. आईवडिलांच्या इच्छेपुढे मलायकाने हार मानत लग्नास तयार झाली. रविवारी रात्री आठ वाजता जरीपटक्यात मलायकाच्या साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू होता.
पुनित राऊत आणि त्याचे नातेवाइकाने मलायकाच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमात फिल्मीस्टाईल एन्ट्री मारली. त्याने ‘हम बने..तुम बने..एकदुजे के लिए’ म्हणत भर कार्यक्रमात स्टेजवरून मलायकाला खाली खेचले. तिच्या भावी पतीला खाली खेचून बदडण्यास सुरुवात केली. त्याच्या अंगातील कपडे फाडून लग्नास तयार झाल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
पुनित राऊत व त्याच्या तीन भावंडांनी साक्षगंधाच्या कार्यक्रमात तोडफोड केली. हार-तुरे फेकून दिले तर जेवणाची भांडी आणि स्टेजची तोडफोड केली. मुलीकडील नातेवाइकांना धमकी देऊन पळवून लावले तर मुलांकडील मंडळीने लागलीच पळ काढला. या प्रकरणाची तक्रार जरीपटक्यात करण्यात आली. पोलिसांनी पुनितसह चौघांवर गुन्हे दाखल केले.