नागपुरात आजपासून आठवडाभर लॉकडाऊन; तब्बल 100 ठिकाणी नाकाबंदी

नागपुरात आजपासून आठवडाभर लॉकडाऊन; तब्बल 100 ठिकाणी नाकाबंदी

नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागपुरात आजपासून आठवडाभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.

तब्बल 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करीत आहेत. सध्या तरी पोलीस लोकांवर सक्ती करी नसून समजावून सांगत आहेत. ओळख पत्र पाहून लोकांना सोडले जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.
वस्त्यांमध्ये सुद्धा पोलीस गाड्यानी फिरून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करीत आहेत.

 

लातूर जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद
लातूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. दिनांक ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद राहणार आहेत. त्याचबरोबर संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

 

उस्मानाबादेत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्मानाबाद : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. नागरिकांनी घरात बसणे पसंत केल्याने बाजारपेठेतील रस्ते ओस पडले होते; मात्र मुख्य रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कायम होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी शहरात फिरुन दुकाने न उघडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. या कर्फ्यूमधून दवाखाने, औषध दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते.

 

जामनेरला चार दिवस जनता कर्फ्यू
जामनेर : शहरात १६ मार्चपासून चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय रविवारी तहसीलमध्ये झालेल्या बैठकीत आमदार गिरीश महाजन यांनी जाहीर केला. बंदमधून वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने व दूध डेअरींना वगळण्यात आले आहे. दूधविक्री सकाळी व सायंकाळी ६ ते ९ यावेळेत सुरू राहील, असे सांगण्यात आले.