नागपूर : तेलंगणा तसेच म्हैसूर एक्स्प्रेस या दोन गाड्यांमधून आरपीएफने मद्यसाठा जप्त करीत एकाला अटक केली.
पहिली कारवाई मंगळवारी दुपारी पाऊणच्या सुमारास झाली. १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेस ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी होती. यावेळी आरपीएफच्या हेड कॉन्स्टेबल उषा तिग्गा, कॉन्स्टेबल विकास शर्मा, सुषमा ढोमणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. के. सहस्रबुद्धे यांनी या गाडीच्या एस- ८ कोचमध्ये संशयावरून धाड घातली. त्यावेळी तेथे एक बॅग बेवारस आढळली. आजुबाजूच्या प्रवाशांना याबाबत त्यांनी विचारणा केली मात्र ती बॅग कोणाची आहे किंवा ती तेथे कोणी ठेवली याबाबत त्यांना काहीच माहिती नव्हते. त्यामुळे ही बॅग खाली उतरवून पंचांसमक्ष उघडली असता त्यात दारूच्या ३८ बाटल्या आढळल्या.
दुसरी कारवाई दुपारी सव्वा दोनच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरच करण्यात आली. या प्लॅटफॉर्मवर १२९७६ जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस उभी होती. या गाडीच्या जनरल कोचजवळ एकजण काळ्या रंगाची बॅग घेऊन उभा होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने आरपीएफच्या हेड कॉन्स्टेबल उषा तिग्गा, कॉन्स्टेबल विकास शर्मा, सुषमा ढोमणे यांनी त्याला विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता बॅगमध्ये दारूच्या १० बाटल्या सापडल्या.
श्रीधर देवतळ (वय १९, रा. चंद्रपूर) असे या आरोपीचे नाव आहे. हा मद्यसाठा व आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले. या दोन्ही कारवाया वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विरेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या.
अधिक वाचा : कामठी येथून ४६ किलो गांजा जप्त, तिघांना अटक