नागपूर :- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना आता जर्मनीतील कार्ल्सरु (karlsruhe) शहराचे सहकार्य मिळणार आहे. या संबंधी कार्ल्सरु व नागपूर महानगरपालिका यांच्यात जर्मनीमध्ये एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
नुकतेच उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या एका शिष्टमंडळाने जर्मनीतील कार्ल्सरु शहराला भेट दिली. या भेटीत हा करार करण्यात आला. या शिष्टमंडळात नागपूर महानगरपालिकेतर्फे उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलमपेंट कॉर्पोरेशन लि.चे संचालक मंडळातील नामनिर्देशित सदस्य तसेच बसपा गटनेते मोहम्मद जमाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, महाव्यवस्थापक राजेश दुफारे हे सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने ११ ते १८ जुलै दरम्यान कार्ल्सरु शहराचा दौरा केला. यावेळी शिष्टमंडळाने कार्ल्सरु शहरातील विविध कामांची पाहणी केली तसेच स्मार्ट सिटीवरील परिषदांमध्ये सहभाग घेतला. यावेळी महाव्यवस्थापक राजेश दुफारे यांनी नागपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण केले. कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी स्मार्ट सिटीसंदर्भात सादरीकरण केले.
नागपूर आणि कार्ल्सरु यांच्यातील करार हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वकांक्षी व प्रभावी ठरणार आहे. नागरी प्रश्नांवर दोन शहरांमध्ये चर्चा होईल. त्यामुळे जागतिक स्तरावर सहकार्याची भावना विकसित होईल, असा विश्वास कार्ल्सरु शहराचे इनोव्हेशन युनियनचे प्रमुख आर. इचहॉन यांनी व्यक्त केला. कार्ल्सरु शहरातील विकास कामांच्या गतीशिलतेने आपल्याला प्रभावित केले असून या करारामुळे इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशन इंडिया प्रकल्पांतर्गत दोन शहरांमध्ये तंत्रज्ञानाची आदान-प्रदान होईल, असा विश्वास करारादरम्यान उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी व्यक्त केला.