मुंबई: कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो. म्हणूनच असा टोकाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
मुंबई मेट्रो-३ च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आज मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास तूर्त मनाई करण्यात आली आहे.
मेट्रोचे कारशेड ‘आरे’तून हलवून कांजूरमार्ग येथे कामाची सुरुवात करणाऱ्या राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना या विषयावर भाष्य केलं.
‘कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्याय व विधी खाते, अटर्नी जनरल, मुख्यमंत्री एकत्र बसून पुढे काय करायचं हे ठरवतील. काम सुरू करण्यासाठी जे करायचं आहे. त्यावर विचार करून निर्णय होईल,’ असं अजित पवार यांनी सांगितलं.
केंद्र असो किंवा राज्य सरकार, विकासकामांमध्ये कुणीही राजकारण करून नये किंवा अडथळा आणू नये. माझ्या अनेक वर्षांच्या राजकीय जीवनात पवार साहेबांची ५०-५५ वर्षाची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे.
मी ३० वर्षे राजकीय क्षेत्रात काम करतोय. मी कधीही विकासकामात राजकारण आणलं नाही. उलट मदतच करत असतो, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.