एकतर्फी प्रेमातून युवकाचा तरुणीला गळा दाबून मारणाच्या प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून युवकाचा तरुणीला गळा दाबून मारणाच्या प्रयत्न

नागपूर: एकतर्फी प्रेमातून युवकाने गळा दाबून तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना नवीन कामठी येथे मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी प्राणघातक हल्ला व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.

निखिल प्रकाश वानखेडे रा. गंगापूर, उमरेड, असे अटकेतील युवकाचे नाव आहे. तरुणी परिचारिकेच्या अभ्यासक्रमाला आहे. ती निखिल याला ओळखते. निखिल हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. मात्र तरुणीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. त्यामुळे तो संतापला. मंगळवारी सकाळी निखिल तरुणीच्या घरात शिरला. ‘माझ्या प्रेमाचा स्वीकार का करीत नाही. माझ्यात काय कमी आहे’,असे तो तरुणीला म्हणाला. ‘मला शिक्षण पूर्ण करायचे आहे. मी याबाबत विचारही करू शकत नाही’,असे ती निखिल याला म्हणाली. संतप्त निखिल याने तिचा गळा दाबला. तिला मारहाण केली व फरार झाला. शेजाऱ्यांनी नवीन कामठी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शोध घेऊन निखिल याला अटक केली.