नागपूर : ऐतिहासिक मारबत उत्सव यंदा कोरोनामुळे पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा झाला. मिरवणूक आणि धामधुमीत साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यावर निर्बंध घातले होते. त्यामुळे श्रद्धेय असलेल्या पिवळ्या मारबतीचे विसर्जन निवडक पदाधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शहरात पोळ्याच्या करीला दरवर्षी मारबतीची मिरवणूक निघते. जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण करीत ही मिरवणूक नेहरू पुतळा, इतवारी, गांधीबाग, महाल, गांजाखेत चौक, गोळीबार चौक, तांडापेठ या भागातून जायची. शहराच्या विविध भागातून मोठ्या संख्येने लोक मारबत उत्सव बघायला रस्त्यावर उतरायचे. पण यंदा कोरोनामुळे प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली. पण पिवळी आणि काळी मारबतीला श्रद्धेचे स्थान असल्याने दोन्ही मारबतींची निर्मिती करून स्थापना करण्यात आली.
पूजाअर्चा करून बुधवारी मारबतीचे विसर्जन करण्यात आले. पिवळ्या मारबतीचे विसर्जन जागनाथ बुधवारी परिसरातच पार पडले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही लोक मारबतीचे दर्शन घेण्यासाठी गल्लीबोळीत उभे होते. यावेळी उपस्थितांनी ‘कोरोनाला घेऊन जा गे मारबत…’ असे आवाहन केले. पूजाअर्चा करून विसर्जन झाले.
यंदा पिवळी-काळी मारबत भेटलीच नाही
नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत उत्सव समितीतर्फे काळ्या मारबतीची निर्मिती करण्यात येते. जागनाथ बुधवारी येथून निघणारी पिवळी मारबत आणि काळी मारबत यांची नेहरू पुतळ्याजवळ भेट होते. कोरोनामुळे यंदा त्यांची भेट झाली नाही. काळी मारबत उत्सव समितीने मिरवणूक न काढता नेहरू पुतळ्याजवळ मारबतीचे विसर्जन केले.