जस्टीस लोया मूत्यू चौकशीचा प्रश्नच नाही

गोंदिया: नागपुरात मृतावस्थेत आढळलेल्या जस्टीस लोया प्रकरणात अनेकांनी आपल्याकडे माहिती आहे, ती आम्ही आपणास देऊ असे सांगितले होते. त्यापैकी कुणीही कुठलेच कागदपत्र, तक्रार घेऊन न आल्याने या प्रकरणात कुठल्याही चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. सोबतच कोरेगाव भीमा प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यासोबत आढावा घेण्यात आला आहे. चौकशीनंतरच एसआयटी गठीत करण्यासंदर्भात ठरविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. देशमुख म्हणाले, आम्हाला राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. सोबतच उपराजधानीचा ‘क्राइम कॅपिटल’चा डाग पुसून काढायचा आहे. आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्रालयाचा प्रभार राहिल्याने बहुतेक त्यांना याकडे लक्ष देता आले नसावे असे सांगत राज्यातील औरगांबाद, नाशिक व नागपूर अनुक्रमे पहिल्या तीनमध्ये गुन्ह्यात आघाडीवर असल्याचा अहवाल आला आहे. गोंदिया जिल्हा माओवादग्रस्त असून या जिल्ह्यातील सुरक्षेवर सुद्दा लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेली भारत बटालियन याच जिल्ह्यात राहणार यासाठी लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगत प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचेही सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची दिल्लीतील काढलेली सुरक्षा हे राजकीय वैर आहे. पवार हे माजी सरक्षणंमत्री, कृषिमंत्री, मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांची सुरक्षा काढताना या बाबींचा विचार करायला हवा होता. परंतु राजकीय द्वेष ठेवून सुरक्षा व्यवस्था काढण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.

पत्रपरिषदेला आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, आमदार सहसराम कोरेटे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थित होते.

५०० कोटीच्या तांदूळ घोटाळ्यावर चर्चा

गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलञया ५०० कोटी रुपयांच्या तांदूळ उचलप्रकरणात अन्नपुरवठा मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. दोषींविरुद्ध न्यायालयात चांगले वकील लावून कारवाई करण्यासंदर्भात येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे सांगितले. सोबतच गोंदिया जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात १० कोटी रुपयांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे आमदार रहागंडाले यांच्या तक्रारीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.