नवी दिल्लीः मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाने ई-कॉमर्सच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. रिलायन्सने आपले नवे जिओ मार्ट लॉन्च केले आहे. यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात दिग्गज मानल्या जाणाऱ्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला चांगलीच टक्कर मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
‘देश की नई दुकान’ या टॅगलाइनसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण भागात प्रथम जिओ मार्ट सुरू केले जाणार आहे. १२ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत जिओ मार्ट सुरू करण्याविषयी घोषणा करण्यात आली होती. जिओ मार्टची सेवा आम्ही सुरू केली असून, जिओ ग्राहकांना नोंदणी करण्यासाठी सवलत दिली जाणार असल्याची माहिती रिलायन्स रिटेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुरुवातीला जिओ मार्ट तीन क्षेत्रात आपली सेवा देणार असून, पुढे जाऊन अधिकाधिक क्षेत्रात जिओ मार्टची सेवा सुरू होईल, असेही ते म्हणाले.
जिओ मार्टच्या प्लानबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जिओ मार्टच्या ग्राहकांना ५० हजार प्रकारची घरगुती उत्पादने घरपोच देण्याची सुविधा दिली जाणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही सेवा ग्राहकांसाठी मोफत असणार आहे. एखादे उत्पादन किंवा वस्तू परत करावयाची असल्यास त्यासाठी कोणत्याही अटी ठेवण्यात आलेल्या नाहीत.
रिलायन्स रिटेलची ई-कॉमर्स सेवा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येणार आहे. सर्व उत्पादक, व्यापारी, छोटे दुकानदार, ब्रॅण्ड आणि सेवा देणाऱ्यांना या ई-कॉमर्स व्यवसायात जोडले जाणार आहे. सुमारे दोन वर्षांच्या योजनेअंतर्गत ही कामे पार पाडली जाणार आहेत. रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून नेबरहूड स्टोअर, सुपरमार्केट, हायपर मार्केट आदी सेवा पुरवल्या जात आहेत.
दररोज वापरात असणाऱ्या वस्तू, साबण, शॅम्पू आणि अन्य घरगुती सामान्यांच्या विक्रीवर कंपनी सध्या भर देत आहे. चीनमधील अलीबाबा या कंपनीच्या कार्य पद्धतीनुसार, स्थानिक दुकानदारांना ऑनलाइन टू ऑफलाइन बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम रिलायन्स जिओ मार्ट करणार आहे. यानुसार, ऑनलाइन पद्धतीने सर्च केलेली उत्पादने, वस्तू आणि अन्य गोष्टी प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याचा पर्याय यातून उपलब्ध करून देण्यात येतो.