मंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, दोन महिला जखमी

Gulabrao_patil

जळगाव: शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जळगावात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन दोन महिला पदाधिकारी जखमी झाल्या.

उद्धव ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच जळगावात दाखल झाले. मुंबईहून ते गीतांजली एक्सप्रेसने जळगावात पोहचले. त्यांचे स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गुलाबराव पाटील हे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मंगला बारी आणि शोभा चौधरी या जखमी झाल्या. ही बाब काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, गर्दीमुळे गुलाबराव पाटील हे देखील मध्ये अडकले होते. मात्र, त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांनी त्यांना सुरक्षेचे कडे देत जिन्याच्या एका बाजूला केले. गर्दी ओसरल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी गर्दी पांगवल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.