नागपूर : सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे, प्रत्येक घरांमध्ये विज पुरवठा व्हावा, सर्वत्र स्वच्छता राखली जावी आदी मुलभूत सोयी-सुविधा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र या समस्यांसाठीही नागरिकांना संघर्ष करावा लागतो. नागरिकांच्या या मुलभूत सुविधांमध्ये येणा-या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नागपूर शहरातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका झोननिहाय जनसंवाद कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याच नियोजनांतर्गत सोमवारी (ता. ४) धरमपेठ झोनमध्ये ‘जनसंवाद’ केला. यावेळी ते बोलत होते.
मंचावर महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, नगरसेविका वर्षा ठाकरे, रूपा रॉय, उज्जवला शर्मा, डॉ. परिणीता फुके, शिल्पा धोटे, रूतिका मसराम, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक अमर बागडे, सुनील हिरणवार, निशांत गांधी, किशोर जिचकार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त महेश मोरोणे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख व विविध शासकीय कार्यालय, तसेच ओसीडब्ल्यू, एसएनडीएलचे पदाधिकारी उपस्थित होते.
मनपाच्या धरमपेठ झोन कार्यालयात नागरिक सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या सभागृहाचे प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख अन्य मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झोनमधील १५०च्या वर तक्रारींचा निपटारा केला. पुढे बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गडर लाईन, सिवर लाईन, पिण्याच्या पाण्याच्या लाईन संदर्भात शहरातील प्रत्येकच भागात समस्या आहे. नागरिकांना सुविधा देणे हे शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपले कर्तव्य आहे. नियमांचे उल्लंघन न होता किंवा नागरिकांकडून होउ नये याची दक्षता घेउन नागरिकांना सुविधा पुरविण्यात यावी, असेही ते म्हणाले. नाल्यावर अवैध बांधकामाच्या अनेक तक्रारी यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे सादर करण्यात आल्या. याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेउन नाल्यावर अवैध बांधकाम करणा-यांना मुदतीत अवैध बांधकाम केलेले भाग काढण्यासाठी नोटीस बजावणे. त्यानंतरही न काढल्यास कारवाई करणे. येत्या पावसाळ्यापर्यंत नाल्यावरील अवैध बांधकाम हटविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
पांढराबोडी परिसरात असलेल्या दारुच्या दुकानामुळे परिसरात असामाजिक तत्वांचा वावर असतो. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार परिसरातील महिलांनी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंबाझरी पोलिस स्टेशनचे संबंधित पोलिस अधिका-यांना तात्काळ परिसरात भेट देउन समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. सोबतच बाजीप्रभू देशपांडे मैदानात विद्युत दिवे नसल्याने या ठिकाणी रात्री असामाजिक तत्वांचा वावर असतो. याशिवाय गवळीपुरा येथे गायी-म्हशी पालकांकडून रस्त्यावरच शेण टाकण्यात येत असल्याने परिसरातील रस्ताच बंद झाल्याची तक्रार करण्यात आली. रस्त्यावर टाकण्यात आलेले शेण त्वरीत हटवून नागरिकांसाठी रस्ता मोकळा करणे व त्यानंतर रस्त्यावर शेण टाकणा-यांवर योग्य कारवाई करणे तसेच बाजीप्रभू देशपांडे मैदानात तातडीने विद्युत लावण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देशित केले.
काछीपुरा परिसरात वसलेली वस्ती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेत असल्याने या भागात विकास कामांमध्ये अडथळा येत आहे. नागरिकांना सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरविताना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी नागपूर महानगरपालिका व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकारी पदाधिका-यांसोबत बैठक बोलाविण्याचेही निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. हजारीपहाड येथील वस्तीमध्ये विद्युत खांब व विद्युत दिवे नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या वस्तीमध्ये संपूर्ण सर्वे करून येत्या महिनाभरात या वस्तीमध्ये विद्युत खांब व विद्युत दिवे लावून नागरिकांसाठी तात्काळ सुविधा निर्माण करण्याच्यासंबंधी योग्य कार्यवाही करण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देशित केले.
शहरातील मार्गांवर झेब्रा क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी ग्रीन सिग्नल नसल्याने दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे सिग्नल लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झेब्रा क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी ग्रीन सिग्नल लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिली. जनसंवादमध्ये निर्णय न होउ शकलेल्या समस्यांबाबत संबंधित विभागांसोबत बैठक बोलावून लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचेही आश्वासनही यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
अधिक वाचा : महापौर चषक अ.भा. नृत्य स्पर्धा ९ व १० फेब्रुवारीला