महापौर चषक अ.भा. नृत्य स्पर्धा ९ व १० फेब्रुवारीला

नागपूर

नागपूर : नागपूर महानगरपालिका व कलाश्रृंगार नृत्य निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ व १० फेब्रुवारीला सकाळी ८ वाजतापासून ‘महापौर चषक अखिल भारतीय नृत्य स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘महापौर चषक अखिल भारतीय नृत्य स्पर्धे’मध्ये सुमारे ७०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेमध्ये दिव्यांग स्पर्धकही सहभागी होणार असल्याची माहिती क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, कलाश्रृंगार नृत्य निकेतनचे अध्यक्ष सोनू नक्षणे, प्रदीप वाडीभस्मे, नंदकिशोर मोरघडे, दिनेश गुप्ता, कविता भोसले, जया कोहळे, मनिषा झाडे, योगेश्वरी पटले, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी उपस्थित होते.

क्रीडा समिती सभापती नागेश सहारे म्हणाले, अखिल भारतीय स्तरावरील नृत्य स्पर्धेचे नागपूर शहरात पहिल्यांदाच आयोजन होत असून यामुळे अनेक उदयोन्मुख व प्रतिभावंत मुले व मुलींना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. पाच ते १०, १० ते १५ व १५ वर्षावरील अशा तीन वयोगटात ही स्पर्धा होणार असून स्पर्धेमध्ये भरतनाट्यम्, कत्थक, लोकनृत्य, उपशास्त्रीय नृत्य, समुह नृत्य आदी प्रकारांमध्ये ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. स्पर्धेमध्ये मध्यप्रदेश, ओरिशा, छत्तीसगढ, दिल्ली, पश्चीम बंगाल, महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, जळगाव, अकोला, चंद्रपूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरातून स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी सांगितले.

स्पर्धेमध्ये आई फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या संकल्पनेवर आधारित एक विशेष नृत्य सादर करण्यात येणार आहे. या नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना आई फाउंडेशनचे अध्यक्ष व क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्यातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आज नागपूरातील अनेक प्रतिभावंत मुले व मुली विविध डान्स शो तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धांमध्ये सहभागी होउन आपल्या शहराचे नाव लौकीक करीत आहेत. अशा विविध स्पर्धांमध्ये अनेक प्रतिभावंत नृत्य कलावंत पुढे यावेत यासाठी नागपूर महानगरपालिका व कलाश्रृंगार नृत्य निकेतनने पुढाकार घेतला असून यामाध्यमातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत पुढे येतील, असा विश्वास क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा : नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Comments

comments