बंदोबस्तात एवढे मनुष्यबळ नेहमीसाठी गुंतविणे शक्य नाही

Date:

नागपूर :जनता कर्फ्यू’ दरम्यान दाखविलेले गांभीर्य नागरिकांकडून कायम राहिले तर निश्चितच ‘कोरोना’वर मात होऊ शकेल. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगारांची धरपकड आणि गुन्हे होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे दर दिवशी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त रस्त्यावर लावणे शक्य नाही, असे स्पष्ट मत शहर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

‘जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. रस्त्यावर नागरिकांची गर्दी होईल, त्यांना आवरावे लागेल, अशी कुठेही स्थिती निर्माण झाली नाही. पोलिसांनी या दोन दिवसात १४ – १४ तास कर्तव्य सांभाळले. शहरात १५० फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. रस्तेच नव्हेतर गल्लीबोळातही पोलिसांची १७५ वाहने फिरत होती. पोलीस कर्मचारी आणि ठाणेदारच नव्हे तर स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकारीही या दोन दिवसात रात्रंदिवस रस्त्यावर होते. मी स्वत: शहरातील सर्वच भागात फिरलो. नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यांच्या घरात असल्याचे दिसून आले. नागरिकांचा हा समंजसपणा नागपुरातील कोरोनाचा संसर्ग कमी करेल, असा विश्वास या दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूमुळे निर्माण झाला आहे, असे मत पोलीस आयुक्तांनी व्यक्त केले.

आवश्यक तेथे नाकेबंदी, फिक्स पॉईंट
यापुढेही शहरातील विविध भागात आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी आणि फिक्स पॉईंट नियमित राहील, असे डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे सहकार्य पोलिसांना अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related