नागपूर : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी यांच्यातील क्रिकेट मैदानावर असलेली ठस्सन मैदानाबाहेरही दिसू लागली आहे. गंभीरच्या नावावर विक्रम नाहीत, फक्त अहंकारच असल्याचे आफ्रिदीने म्हटले. तर, गंभीरनेही पलटवार करताना आफ्रिदीला मानसोपचार तज्ञाची आवश्यकता असून त्याच्या उपचाराची जबाबदारी घेणार असल्याचे म्हटले आहे.
सध्या शाहीद आफ्रिदीचे आत्मचरित्र ‘गेम चेंजर’ चर्चेत आहे. या पुस्तकात आफ्रिदीने आपल्या वयाचा खुलासा केल्यामुळे मागील काही दिवसांपासून पुस्तकाची चांगलीच चर्चा सुरू आहे. आफ्रिदी आत्मचरित्रात गंभीरवर जोरदार टीका केली आहे. गंभीरच्या नावावर विक्रमांची नोंद नाही. त्याच्या नावावर केवळ अहंकार असल्याची टीका आफ्रिदीने केली आहे. खेळाडू म्हणून गंभीर फक्त नकारात्मक विचार घेऊन खेळायचा. अशा लोकांना आम्ही कराचीत सनकी म्हणतो. तुम्ही रागीट आणि स्पर्धात्मक वर्तवणूक करत असाल तरी हरकत नाही मात्र तुम्ही सकारात्मक रहावे, गंभीर तसा नव्हता, असे मत आफ्रिदीने आत्मचरित्रात नोंदवले आहे.
आफ्रिदी पुस्तकातील हा भाग समोर आल्यानंतर गौतम गंभीरनेही आफ्रिदीला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमधील अनेक नागरीक उपचारासाठी भारतात येत असतात. त्यामुळे आफ्रिदीने भारतात मानसोपचार तज्ञाकडे उपचार करुन घ्यावेत. त्याची जबाबदारी मी घेत असल्याचा सणसणीत टोला गंभीरने लगावला आहे.
कानपूरमध्ये २००७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात गंभीर आणि आफ्रिदीमध्ये वाद झाला होता. खेळांच्या नियमांचा भंग करुन मैदानात वाद घातल्याबद्दल आयसीसीने दोघांनाही दंड ठोठावला होता. यासह इतरही काही सामन्यात गंभीर व आफ्रिदीत खटके उडाले होते.
अधिक वाचा : निवडणूक आयोग पक्षपाती; राहुल गांधींचे टीकास्त्र